Rinku Singhs 5 Sixes In Row: इंडियन प्रिमिअर लिगमध्ये (IPL 2023) रविवारी झालेल्या सामन्यामध्ये अगदीच चमत्कारिक विजयासहीत कोलकाता नाईड रायडर्सने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. स्पर्धेतील 13 व्या सामन्यामध्ये कोलकात्याच्या रिंकू सिंहने तुफान फलंदाजी केली. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यातील शेवटच्या ओव्हरमध्ये रिंकू सिंहने अशक्य वाटणारा विजयश्री खेचून आणला. रिंकूने शेवटच्या ओव्हरमध्ये केलेली फलंदाजी पाहून अनेकजण त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहे. रिंकू रातोरात स्टार झाला आहे. अगदी संघ मालक शाहरुख खानपासून ते परदेशातील खेळाडूही रिंकूचं कौतुक करत आहेत. अशातच आता रिंकूच्या या खेळीतील बॅटसंदर्भात एक रंजक माहिती समोर आली आहे.
शेवटच्या ओव्हरमध्ये 5 चेंडूंमध्ये 28 धावांची गरज असताना 5 षटकार रिंकूने ज्या बॅटने लगावले ती बॅट त्याने उधारीवर घेतली होती. यासंदर्भातील खुलासा कोलकाता नाईट रायडर्सनेच पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमधून करण्यात आला आहे. केकेआरच्या अधिकृत ट्वीटर हॅण्डलवरुन पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये केकेआरचा कर्णधार नितीश राणाने या बॅटसंदर्भातील रंजक किस्सा सांगितला आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये केकेआरला विजयासाठी 6 चेंडूंमध्ये 29 धावांची आवश्यकता होती. केकेआरचे उमेश यादव आणि रिंकू सिंह मैदानात होते. तर गोलंदाजीसाठी गुजरातचा यश दयालने चेंडू हातात घेतला. त्यावेळी गुजरातचं पारडं जड आहे असं वाटत होतं. ओव्हरमधील पहिल्या चेंडूवर उमेश यादवने एक धाव काढून स्टाइल रिंकू सिंहला दिला. त्यानंतर रिंकूने एकामागोमाग एक 5 षटकार लगावले.
रिंकूच्या याच तुफान फलंदाजीसंदर्भात केकेआरच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन एक 32 सेकंदांचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये नितीश राणा एक बॅट घेऊन उभा असल्याचं दिसतं. या व्हिडीओमध्ये नितीश राणा ही बॅट त्याची असल्याचं सांगतो. ही बॅट रिंकूने त्याच्याकडे मागितली होती. मात्र ही बॅट रिंकूला देण्याची आपली इच्छा नव्हती. मात्र कोणीतरी ड्रेसिंग रुममधून ही बॅट डगआऊटमध्ये आणली. नितीशने मागील 2 सामन्यामध्ये याच बॅटने आपण फलंदाजी केल्याचं सांगितलं. सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफीची संपूर्ण मालिका आपण याच बॅटने खेळलो, असंही नितीशने सांगितलं.
Rinku claimed the match #GTvKKR | #AmiKKR | #TATAIPL 2023 | @NitishRana_27 | @rinkusingh235 pic.twitter.com/vHWVROar8P
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 9, 2023
रिंकूने आपल्या फलंदाजीने सर्वांनाच वेड लावलं असून आपण केवळ चेंडूवर लक्ष ठेवलं होतं आणि चेंडू येईल तसे फटके मारत गेलो असं साधं लॉजिक या 5 षटकारांबद्दल बोलताना त्याने सांगितलं. या व्हिडीओमध्ये ज्या बॅटने रिंकूने हे 5 षटकार लगावला त्या बॅटचा पिकअप फार छान असून वजनालाही ती फार हलकी असल्याचं नितीश राणा सांगताना दिसतो. तसेच व्हिडीओच्या शेवटी नितीश राणा आता ही बॅट माझी राहिलेली नाही, ती रिंकूची झाली आहे असं सांगतो.