IPL 2023: इंडियन प्रीमियर लीग (IPL) सध्या सुरु असून यादरम्यान खेळाडूंच्या सुरक्षेत मोठी त्रुटी आढळली आहे. या घटनेनंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला असून, खळबळ माजली आहे. आयपीएल सध्या 12 वेगवेगळ्या ठिकठिकाणांवर खेळली जात असून आतापर्यंत 21 सामने झाले आहेत. यादरम्यान, आयपीएल संघ थांबलेल्या हॉटेलमध्येच गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे तिघेजणह थांबले असल्याने खळबळ उडाली आहे. या तिघांनी हॉटेलात रुम बूक केले होते. तसंच तिथे आरामात राहत होते. णण माहिती मिळताच पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.
चंदिगडमध्ये हा प्रकार घडला आहे. आयटी पार्क पोलिसांनी तिन्ही कुख्यात गुंडांना अटक केली आहे. या तिघांवर गोळीबारासह अन्य गुन्हेही दाखल आहेत. हे तिघेही आयपीएल संघ थांबलेल्या हॉटेलमध्ये सापडल्याने खळबळ उडाली आहे.
मोहालीमध्ये 20 एप्रिलला पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना झाला होता. बंगळुरुने 24 धावांनी हा सामना जिंकला होता. या सामन्याआधी विराट कोहलीसह संघातील अनेक महत्त्वाचे खेळाडू आयटी पार्कमधील हॉटेलमध्ये थांबले होते. पण याचवेळी पोलिसांना काही हिस्ट्री शीटर याच हॉटेलमध्ये वास्तव्य करत असल्याची माहिती मिळाली आणि एकच खळबळ उडाली. यानंतर पोलिसांनी रात्री 10.30 वाजता हॉटेलमध्ये पोहोचून तिघांनी बेड्या ठोकल्या. या आरोपींची नावं रोहित, मोहित भारद्वाज आणि नवीन अशी आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, या आरोपींकडे बेकायदेशीर शस्त्रं असतील अशी पोलिसांना शंका होती. आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता पोलिसांना कोणतीही जोखमी पत्करायची नव्हती. त्यांनी आरोपींच्या रुमसह संपूर्ण हॉटेलची पाहणी केली. त्यांच्या कारची पाहणी करण्यात आल्यानंतर अखेर त्यांना अटक करण्यात आली. दरम्यान पोलिसांनी त्याचा रुम किंवा हॉटेलमधून काय सापडलं आहे याची माहिती जाहीर केलेली नाही.
पोलीस सध्या या आरोपींची चौकशी करत आहेत. आंतरराष्ट्रीय सट्टेबाजांच्या संपर्कात ते होते का याची माहिती पोलीस घेत आहेत. दरम्यान, पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, आयपील संघ चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर थांबलेला होता. पाचव्या मजल्यावर विराट कोहली आणि इतर खेळाडू होते. तर चौथ्या मजल्यावर क्रिकेट संघासह आलेला स्टाफ होता. पोलिसांनी गुन्हेगारांना तिसऱ्या मजल्यावरुन अटक केलं आहे.
गुन्हेगार दुपारी जवळपास 1.30 वाजण्याच्या सुमारास हॉटेलमध्ये पोहोचले होते. त्यांनी फक्त एका दिवसासाठी रुम बूक केली होती. शुक्रवारी संघासह तेदेखील हॉटेल सोडणार होते. पण पोलिसांनी त्याआधीच त्यांना अटक केली.
आरोपींमधील रोहित याच्यावर गोळीबाराचा गुन्हा आहे. एका नेत्याच्या वाढदिवशी त्याने गोळीबार केला होता. तर नवीन याच्याविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. तर मोहित याला शस्त्रांसह अटक करण्यात आली होती.