IPL 2024 Harsha Bhogle On Hardik Pandya: मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये म्हणजेच व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये हार्दिक पंड्या अष्टपैलू खेळाडू म्हणून भारतीय संघाचा आधारस्तंभ मानला जातो. मात्र इंडियन प्रिमिअर लीगमधील सध्याची हार्दिकची कामगिरी पाहता त्याच्याकडे केवळ फलंदाज म्हणून पहावं लागलं तर? केवळ फलंदाज म्हणून हार्दिक पंड्याला जून महिन्यात होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या भारतीय संघात स्थान मिळेल का? मागील काही सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार असलेल्या हर्दिकने टाकलेल्या ओव्हर आणि त्याची एकंदरित कामगिरी फारच सुमार दर्जाची राहिली असून याच पार्श्वभूमीवर आता हार्दिकला भारतीय टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या संघात स्थान मिळणार का याबद्दल शंका उफस्थित केली जात आहे.
राजस्थान रॉयलर्स, दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यांमध्ये हार्दिक पंड्याने गोलंदाजीच केली नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्धच्या सामन्यातील एका ओव्हरमध्ये हार्दिकने 13 धावा दिल्या. रविवारी वानखेडेवर झालेल्या चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यातही हार्दिक पंड्याने 3 ओव्हरमध्ये 43 धावा दिल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये धोनीने हार्दिकच्या गोलंदाजीवर 4 बॉलमध्ये 20 धावा केल्या.
हार्दिकची सध्याची गोलंदाजी पाहता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या म्हणजेच बीसीसीआयच्या निवड समितीच्या सदस्यांची चिंता नक्कीच वाढली आहे. हार्दिकने मुंबईच्या पहिल्या काही सामन्यांमध्ये स्वत: कर्णधार म्हणून सुरुवातीच्या ओव्हर टाकल्या. मात्र त्या ओव्हरमध्ये त्याने बऱ्याच धावा दिल्या. तसेच पहिल्या काही सामन्यानंतर हार्दिकने गोलंदाजीसंदर्भात फारशी चमक दाखवलेली नाही. अनेकांनी तर हार्दिकला काहीतरी इजा झाली असून तो ती लपवत असल्याचीही शंका उपस्थित केली. या इजेमुळेच हार्दिकला त्याच्या नावाला साजेशी गोलंदाजी करता येत नसल्याचं बोललं जात आहे.
नक्की वाचा >> वर्ल्डकपचा उल्लेख करत हरभजनचा रोहित, द्रविडला धोक्याचा इशारा! म्हणाला, 'तो फार..'
न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू आणि सध्या समालोचन करणाऱ्या सायमन डॉल यांनी तर हार्दिकला इजा झाल्याचं आपल्याला फार प्राकर्षाने वाटत असून त्यामुळेच त्याला पूर्ण क्षमतेने गोलंदाजी करता येत नसल्याचं म्हटलं आहे. "तुम्ही पहिल्या सामन्यामध्ये थेट गोलंदाजीला सुरुवात करुन स्टेटमेंट करण्याचा प्रयत्न करता. त्यानंतर अचानक तुम्ही गायब होता," असं सायमन यांनी 'क्रिकबझ'शी बोलताना म्हटलं. "त्याला नक्कीच दुखापत झाली आहे. मी तुम्हाला सांगतो की त्याच्याबरोबर काहीतरी घडलंय जे तो लपवतोय. तो जे घडलंय ते सार्वजनिकपणे मान्य करायला तयार नाही. मात्र त्याच्याबरोबर नक्कीच काहीतरी घडलं आहे. मला फार प्राकर्षाने असं वाटतंय" असं मत सायमन यांनी व्यक्त केलं.
सायमन यांचं हे मत ऐकून भारतीय समालोचक हर्षा भोगले यांना यावरुनच एक प्रश्न विचारण्यात आला. खरोखरच हार्दिक गोलंदाजी करु शकत नसेल तर केवळ फलंदाज म्हणून त्याला विश्वचषकाच्या संघात स्थान द्यायला हवं का? असा प्रश्न हर्षा यांना विचरण्यात आला. यावर उत्तर देताना हर्षा भोगले यांनी नकारात्मक उत्तर दिलं. केवळ फलंदाज म्हणून विचार करायचा असेल तर हार्दिकहूनही अधिक उत्तम फलंदाज उपलब्ध असल्याचं हर्षा भोगलेंनी म्हटलं आहे.
नक्की वाचा >> 'स्टम्पमागाची व्यक्ती त्यांना..'; CSK ने केलेल्या लाजीरवाण्या पराभवानंतर पंड्याचं धोनीबद्दल विधान
"हार्दिक गोलंदाजी करणार नसेल तर त्याला टी-20 विश्वचषकाच्या संघात स्थान दिलं पाहिजे का? याचं उत्तर द्यायचं झाल्यास तो गोलंदाजी करणार नसेल तर तो भारतामधील अव्वल 6 फलंदाजांपैकी एक आहे का? याबद्दल बोललं पाहिजे. अव्वल 6 फलंदाजांमध्ये तो आहे की नाही हे विचारल्यास मी नकारात्मक उत्तर देईन. केवळ फलंदाज म्हणून त्याला संघात स्थान घ्यावं या मताशी मी फारसा सहमत नाही. यामागील मुख्य कारण म्हणजे तो गोलंदाज करत नसेल तर त्याचा संघासाठी पूर्ण क्षमतेने वापर होत नाहीय. तो केवळ फलंदाज म्हणून असेल तर त्याने वरच्या क्रमांकावर आलं पाहिजे जिथे अधिक स्पर्धा आहे," असं हर्षा भोगलेंनी 'क्रिकबझ'शी बोलताना म्हटलं. म्हणजेच केवळ फलंदाज म्हणून हार्दिक पंड्याचा टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी निवडल्या जाणाऱ्या भारतीय संघात विचार केला जाऊ नये असं मत ह्षा भोगलेंनी व्यक्त केलं आहे.