IPL 2024: आयपीएलच्या सध्याच्या हंगामात मुंबई इंडियन्स संघ सर्वाधिक चर्चेत असलेला संघ ठरत आहे. एकीकडे मुंबई इंडियन्स संघाच्या कर्णधारपदावरुन चाहते नाराज असताना, दुसरीकडे सलग तिसरा सामना गमावला आहे. रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेत हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आल्याने नाराज चाहते सतत संताप व्यक्त करत आहे. तर दुसरीकडे हार्दिकही संघाला आपल्या नेतृत्वात अपेक्षित यश मिळवून देऊ शकलेला नाही. सोमवारी राजस्थानने सलग तिसऱ्या विजयाची नोंद करताना, मुंबईने मात्र सलग तिसरा सामना गमावला आहे. यादरम्यान मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने एक पोस्ट शेअर केली आहे.
मुंबईच्या सलग तिसऱ्या पराभवानंतर चाहते नाराजी व्यक्त करत असताना हार्दिक पांड्याने एक्सवर पोस्ट शेअर करत मनोबल उंचावण्याचा प्रयत्न केला आहे. "या संघाबद्दल तुम्हाला एक गोष्ट माहित असली पाहिजे, आम्ही कधीही हार मानणार नाही. आम्ही लढत राहू, आम्ही वाटचाल कायम ठेवू," असं हार्दिक पांड्या म्हणाला आहे.
आयपीएच्या 14 व्या सामन्यामध्ये राजस्थान रॉयल्सच्या संघाने 27 बॉल आणि 6 विकेट्स राखून मुंबई इंडियन्सच्या संघाला घरच्या मैदानावर धूळ चारली. यासह राजस्थानने सलग तिसरा सामना जिंकला. तर मुंबईने मात्र लाजिरवाणी कामगिरी करत सलत तिसरा पराभव नोंदवला. मुंबईने 3 सामने गमावले असून गुणतालिकेत तळाशी आहे. दुसरीकडे तिसऱ्या विजयासहीत संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थानच्या संघाने पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने 20 ओव्हर्समध्ये लगावत 125 धावा केल्या. त्यानंतर राजस्थान रॉयल्सने 27 चेंडू आणि 6 गडी राखून आव्हान पूर्ण केले. मुंबईने पहिल्या 4 विकेट्समध्ये केवळ 20 धावा केल्या होत्या. रोहित शर्मा, नमन धीर, देवाल्ड ब्रेविस यांना खातंही उघडता आलं नाही. हार्दिक पांड्याने 21 चेंडूत 6 चौकारांसह 34 धावा केल्या.
मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर हार्दिक पांड्या म्हणाला की, "होय, एक कठीण रात्र, आम्हाला हवी तशी सुरुवात करायला मिळाली नाही. मला पलटवार करायचा होता, आम्ही 150-160 धावा करण्याच्या चांगल्या स्थितीत होतो, पण माझ्या विकेट्समुळे सामना महागात पडला. मी थोडी चांगली कामगिरी करायली हवी होती. अशा खेळपट्टीचीही अपेक्षा नव्हती. गोलंदाजांसाठी पोषक खेळपट्टी होती. कधी कधी निकाल आपल्या बाजूने असतो तर कधी नसतो. एक संघ म्हणून आम्हाला वाटतं की, आम्ही खूप चांगलं करु शकतो पण आम्हाला शिस्तबद्ध होण्याची आणि धाडस दाखवण्याची गरज आहे".
मुंबईचा पुढचा सामना वानखेडेवरच होणार आहे. 7 एप्रिल रोजी होणाऱ्या या सामन्यात मुंबईचा संघ दिल्लीच्या संघाविरुद्ध मैदानात उतरणार असून चौथ्या सामन्यात तरी मुंबईला विजय मिळतो का हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.