ख्राईस्टचर्च : भारताच्या अंडर १९ संघाने वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा २०३ धावांनी धुव्वा उडवला. यासोबतच फायनलमध्ये स्थान पक्के केले.
तीन फेब्रुवारीला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात फायनल मुकाबला रंगणार आहे. भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी ठेवलेले २७३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ ६९ धावांत गुंडाळला गेला.
भारताचा वेगवान गोलंदाज इशान पोरेलने पाकिस्तानचे कंबरडे मोडले आणि सुरुवातीलाच चार विकेट घेतल्या.
इशानने पाकिस्तानला सुरुवातीलाच चार दणके दिले. त्याने चौथ्या ओव्हरमध्ये पाकला पहिला झटका दिला. त्यानंतर सहाव्या, आठव्या आणि १२व्या ओव्हरमध्ये त्याने पाकिस्तान एकामागोमाग एक झटके दिले. इशानने इमरान शाह, मोहम्मद जैद, अली जयरेब, अम्माद आलमला तंबूत पाठवले.
इशानशिवाय शिवा सिंग आणि रियान यांच्या स्पिनर जोडीने पाकिस्तानला गुडघे टेकण्यास भाग पाडले. या दोघांनी प्रत्येकी दोन विकेट घेत भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले.