पुणे : काल पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन स्टेडियममध्ये सनरायझर्स हैदराबाद विरूद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात बाजी मारत राजस्थानने 61 रन्सने हैदराबादचा पराभव केला. शिवाय या सामन्यात हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सन याला थर्ड अंपायरच्या चुकीच्या निर्णयालाही सामोरं जावं लागलं. यातच भर म्हणून केनला सामना संपल्यानंतर अजून एक मोठा फटका बसला आहे.
पराभवाचं दुःख असतानाच केन विलियम्सनला दंड भरावा लागणार आहे. सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केनला 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलच्या आचारसंहितेनुसार, स्लो ओव्हर टाकल्यामुळे केनवर कारवाई करण्यात आली आली आहे.
यासंदर्भात बीसीसीआयने एक निवेदन जारी केलं आहे. या निवेदनात नमूद केल्यानुसार, राजस्थान रॉयल्सविरुद्ध स्लो ओव्हर रेटमुळे सनरायझर्स हैदराबादला दंड ठोठावण्यात आला आहे. या सिझनमधील या टीमची ही पहिली चूक आहे. त्यामुळे आयपीएलच्या आचारसंहितेनुसार केन विलियम्सनवर 12 लाखांचा दंड ठोठावण्यात येत आहे.
दरम्यान स्लो ओव्हर टाकण्याची कर्णधार केन विल्यमसनची ही पहिली चूक होती. त्यामुळे त्याला केवळ 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला. मात्र केनने पुन्हा ही चूक केली तर त्याला 24 लाखांचा दंड भरावा लागू शकतो. यानंतर तिसऱ्यांदा चूक झाली तर 30 लाखांच्या दंडासोबत केनवर एका मॅचची बंदीही लागू शकते.
सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्या खेळल्या गेलेल्या सामन्यात ज्या पद्धतीने कर्णधार केन विलियम्सनला आऊट देण्यात आलं त्यावरून आता वाद होताना दिसतायत. केनचे चाहते थर्ड अंपायरने दिलेल्या या निर्णयावर संताप व्यक्त करतायत. त्यामुळे आयपीएल 2022 सुरु होऊन चौथ्याच दिवशी वादाला तोंड फुटलं आहे.