सूरत : भारतातली सगळ्यात मोठी टी-२० स्पर्धा समजली जाणाऱ्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीवर कर्नाटकने नाव कोरलं आहे. मनिष पांडेच्या टीमने फायनलमध्ये तामीळनाडूचा पराभव केला आहे. सूरतमध्ये खेळवण्यात आलेल्या अत्यंत रोमांचक अशा मॅचमध्ये कर्नाटकने तामीळनाडूवर १ रनने मात केली.
तामीळनाडूने फायनलमध्ये टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. यानंतर कर्नाटकने २० ओव्हरमध्ये १८०/५ एवढा स्कोअर केला. या आव्हानाचा पाठलाग करताना तामीळनाडूला शेवटच्या ४ बॉलमध्ये विजयासाठी ५ रनची गरज होती, पण त्यांना ३ रनच करता आल्या.
कर्नाटकचा ४० दिवसांमधला हा दुसरा मोठा किताब आहे. २५ ऑक्टोबरला कर्नाटकने विजय हजारे ट्रॉफीही जिंकली होती. विजय हजारे ट्रॉफीच्या फायनलमध्येही कर्नाटक आणि तामीळनाडूचा मुकाबला झाला होता.
कर्नाटककडून कर्णधार मनिष पांडेने ४५ बॉलमध्ये सर्वाधिक ६० रनची खेळी केली. रोहन कदमने २८ बॉलमध्ये ३५ आणि देवदत्त पडिक्कलने २३ बॉलमध्ये ३२ रन केले. केएल राहुलने १५ बॉलमध्ये २२ रन आणि करुण नायरने ८ बॉलमध्ये १७ रन केले. तामीळनाडूकडून आर. अश्विन आणि मुरुगन अश्विनने २-२ विकेट घेतल्या. वॉशिंग्टन सुंदरला १ विकेट मिळाली.
कर्नाटकच्या आव्हानाचा पाठलाग करताना तामीळनाडू हा सामना जिंकेल असं वाटत होतं. शेवटच्या ओव्हरमध्ये तामीळनाडूला विजयासाठी १३ रनची गरज होती. कृष्णप्पा गौतमच्या या ओव्हरच्या पहिल्या दोन बॉलवर अश्विनने फोर मारल्या. आता तामीळनाडूला विजयासाठी ४ बॉलमध्ये ५ रनची गरज होती. ओव्हरच्या तिसऱ्या बॉलला अश्विनला एकही रन काढता आली नाही. चौथ्या बॉलवर अश्विनने एक रन काढली. आता कर्नाटकला विजयासाठी २ बॉलमध्ये ४ रन हवे होते. पाचव्या बॉलवर विजय शंकरने दुसरी रन काढण्याचा प्रयत्न केला आणि तो रन आऊट झाला. सहाव्या बॉलवर मुरुगन अश्विन फक्त १ रन काढू शकला.
तामीळनाडूकडून विजय शंकरने ४४ रन, बाबा अपराजित ४० रन, वॉशिंग्टन सुंदर २४ रन, दिनेश कार्तिक २० रन, आर. अश्विन १६ रन आणि शाहरुख खानने १६ रन केले. कर्नाटककडून रोनित मोरेने सर्वाधिक २ विकेट घेतल्या. कृष्णप्पा गौतम, श्रेयस गोपाळ आणि जे. सुचिथला एक-एक विकेट मिळाली.