मुंबई : आयपीएलच्या ११ व्या मोसमासाठी सगळ्या ८ टीम्सनी मिळून १८ खेळाडूंना कायम ठेवलं आहे. तर उरलेल्या खेळाडूंना २७ आणि २८ जानेवारीला लिलावामध्ये विकत घेता येणार आहे.
खेळाडूंना कायम ठेवण्याबाबतचा निर्णय घेताना कोलकाता नाईट रायडर्सनी सगळ्यांनाच धक्का दिला. कोलकाता नाईट रायडर्सच्या टीमनं गौतम गंभीरला कायम न ठेवता सुनिल नारायण आणि आंद्रे रसेलला टीममध्ये कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.
केकेआरनं गौतम गंभीरला मुक्त केल्यामुळे आता गंभीर कोणत्या टीमकडून खेळणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. गौतम गंभीर हा चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळताना दिसेल, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.
गौतम गंभीरबाबत चेन्नई सुपरकिंग्जकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली तरी सीएसकेच्या ट्विटर हॅण्डलवरून याबाबत इशारा दिलाय.
एका ट्विटर युजरनं गंभीर चेन्नईकडून खेळेल असा माझा अंदाज असल्याचं ट्विट सीएसकेला टॅग करून केलं. या ट्विटला सीएसकेनंही स्माईली देऊन रिप्लाय दिला आहे. शक्यतो कोणतीही टीम ट्विटरवरून अशाप्रकारे रिप्लाय देत नाही, त्यामुळे गंभीरबाबतच्या चर्चांना सीएसकेकडूनचं हवा मिळाली आहे.
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) January 5, 2018