KL Rahul Century: भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान सेंच्युरियन येथे सुरु असलेल्या बॉक्सिंग डे कसोटीमध्ये यजमान संघाने पहिल्या डावात आघाडी मिळवली आहे. या सामन्यामध्ये भारतीय संघाचा डाव 245 धावांवर आटोपला. मात्र यजमान दक्षिण आफ्रिकेकडून अंतिम कसोटी खेळणारा सलामीवीर डीन एल्गारने संयमी शतक झळकावत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यापूर्वी भारतीय संघाला 250 च्या आसपासची सन्मानपूर्व धावसंख्येपर्यंत पोहचवण्यात मधल्या फळीत खेळण्यासाठी आलेल्या के. एल. राहुलने कारकिर्दीमधील आठवं शतक फार महत्त्वाचं ठरलं. के. एल. राहुलने षटकार लगावत शतक साजरं केलं. मात्र तो 101 धावांवर बाद झाला. या शतकानंतर के. एल. राहुलने एक खंत उघडपणे बोलून दाखवली आहे.
राहुलच्या शतकी खेळीच्या जोरावर भारत सन्माजनक धावसंख्येपर्यंत पोहचल्यानंतर दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकेने 11 धावांची आघाडी मिळवली. दुसऱ्या डावाचा खेळ संपल्यानंतर के. एल. राहुलने पहिली प्रतिक्रिया नोंदवली. "आज मी शतक झळकवल्याने लोक माझं कौतुक करत आहे. 3-4 महिन्यापूर्वी प्रत्येकजण मला शिव्या देत होता. हा खेळाचा भाग आहे. मात्र या साऱ्याचा परिणाम आमच्यावर होत नाही असं म्हणता येणार नाही. याचा नक्कीच परिणाम होतो," अशी खंत राहुलने व्यक्त केली आहे. "या साऱ्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे याची जेवढ्या लवकरच जाणीव होईल तितका फायदा तुम्हाला खेळता होतो," असंही राहुलने पुढे म्हटलं.
के. एल. राहुलने 137 चेंडूंमध्ये 14 चौकार आणि 4 षटकार लगावत 101 धावांची खेळी केली. शतक झळकावल्यानंतर पुढच्याच ओव्हरला नान्ड्रे बर्गरने राहुलला बोल्ड केलं. भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी राहुलवर कौतुकाचा वर्षाव करताना, "आतापर्यंत मी पाहिलेल्या कसोटीमधील सर्वोत्तम शतकी खेळींपैकी राहुलची खेळी टॉप 10 मध्ये नक्कीच आहे," असं म्हटलं आहे.
KL Rahul said, "today I've scored a hundred so people are singing praises. 3-4 months ago, everybody was abusing me. It's part of the game, but I can't say it doesn't affect you. It does. The sooner you realise that staying away from it is good for your game the better it is". pic.twitter.com/mYV6XvTtqj
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 28, 2023
भारताने दिलेल्या आव्हानांचा पाठलाग करताना डावखारा सालामीवीर एल्गरसमोर भारतीय गोलंदाज निष्प्रभ ठरले. सावध फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या एल्गरने स्कोअरकार्ड हलता ठेवण्याचा प्रयत्न केला. एल्गरच्या या अनपेक्षित खेळीमुळे भारतीय गोलंदाजांवर दडपण आलं. मोहम्मद सिराजने एनडीन मार्करमला केवळ 5 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर बाद करत भारताला चांगली सुरुवात करुन दिली. मात्र भारतीय गोलंदाजांना कामगिरीत सातत्य राखता आलं नाही. एक्गार आणि टोनी डी झोर्झीने दुसऱ्या गड्यासाठी 93 धावांची पार्टनरशीप केली. जसप्रीत बुमराहने झोर्झी आणि कीगदन पीटरसनला झटपट बाद केल्यानंतर भारत सामन्यावर पकड मिळवले असं वाटत असतानाच एल्गरने संयमी फलंदाजी करत आफ्रिकेच वर्चस्व कायम राखले.