Mirabai Chanu Periods Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 3 कांस्य पदकानंतर भारताला एकाही पदकाची कमाई केलेली नाही. बुधवारी वेटलिफ्टर मीराबाई चानू हिच्याकडून सर्व भारतीयांना पदकाची अपेक्षा होती. मात्र मीराबाईला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावा लागलं. मीराबाईला क्लीन अँड जर्कच्या शेवटच्या प्रयत्नात 114 किलो वजन उचलता आलं नाही आणि त्यामुळे ती पदकाच्या शर्यतीतून बाहेर पडली.
8 ऑगस्ट म्हणजेच आज मीराबाईचा वाढदिवस होता, अशा परिस्थितीत तिला इतिहास रचण्याची संधी होती. दरम्यान सामना झाल्यानंतर मीराबाईच्या सांगण्यानुसार, सामन्याच्या दिवशी तिच्या मासिक पाळीचा तिसरा दिवस होता, त्यामुळे तिला खेळणं कठीण गेलं.
मीराबाई चानू म्हणाली की, मी माझ्या कामगिरीने प्रचंड खूश आहे. सर्वांना माहितीये मी दुखापतीचा सामना केला आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये माझ्यासोबत काय झाले हे सर्वांना माहीत आहे. तेव्हाही माझं पदक हुकलं होतं. हे प्रत्येक खेळाडूसोबत घडते. त्यानंतर टोकियो ऑलिम्पिकमध्ये मी भारतासाठी रौप्यपदक जिंकलं. यावेळीही मी प्रयत्न केला, पण दुखापतीमुळे आशियाई क्रीडा स्पर्धेत माझी काय अवस्था झाली होती, हे सर्वांना माहीतीये. मी 4-5 महिन्यांसाठी रिहॅबमध्ये होते. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खूप कमी वेळ होता, मी माझ्याकडून सर्वोत्तम प्रयत्न केला पण ते होऊ शकले नाही.
आज माझं नशीबही खराब होतं आणि माझे पिरीयड्स सुरु होते. माझ्या मासिक पाळीचा तिसरा दिवस होता. जेव्हा मी शेवटच्या ऑलिम्पिकमध्ये खेळत होतो, तेव्हा माझ्या पिरीयड्सचा दुसरा दिवस होता. पण मी माझ्या परीने प्रयत्न केले. यावेळी पदक देऊ न शकल्याबद्दल मी सर्वांची माफी मागते, असंही मीराबाईने सांगितलं आहे.
पहिल्या फेरीत मीराबाईने स्नॅच विभागात 85 किलो वजन उचललं होतं. त्यानंतर क्लीन आणि जर्क प्रकारात 107 किलो वजन उचललं होतं. पहिल्या फेरीनंतर मीराबाई ही पाचव्या स्थानावर होती. दुसऱ्या फेरीत मीराबाई स्नॅच प्रकारात 88 किलो वजन उचलयचं होतं. यावेळी पहिल्यांदा तिला अपयश आले. पण दुसऱ्या प्रयत्नामध्ये मात्र तिने 88 किलो वजन उचललं. त्यामुळे मीराबाईच्या क्रमवारीत सुधारणा झाली आणि तिने तिसऱ्य क्रमांकावर झेप घेतली होती. त्यानंतर क्लीन आणि जर्क प्रकारात तिला अपयश आलं. परिणामी तिला पदक गमवावं लागलं.
मीराबाईला यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून इतिहास रचण्याची संधी होती. ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी ती पहिली भारतीय वेटलिफ्टर ठरू शकली असती. त्याच्या आधी कर्णम मल्लेश्वरीने सिडनीमध्ये 2000 मध्ये कांस्यपदक जिंकले होतं. तिचा हा विक्रम मीराबाईने टोकियोमध्ये रौप्यपदक जिंकून मोडला. 30 वर्षीय मीराबाई चानूने गेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करत रौप्य पदक जिंकले होतं.