भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीची (Mohammed Shami) पत्नी हसीन जहाँ (Hasin Jahan) हिच्यासोबत गैरव्यवहार (misbehavior) झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. शमीच्या पत्नीने 14 ऑक्टोबर रोजी रेल्वे तिकीट तपासणी करणाऱ्या कर्मचार्यावर गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. मोहम्मद शमीच्या पत्नीचे म्हणणे आहे की, गुरुवारी ती बिहारहून (Bihar) कोलकाता (kolkata) ट्रेनने (Train) प्रवास करत असताना तिच्यासोबत गैरवर्तन झाले.
हसीन जहाँच्या (Hasin Jahan) म्हणण्यानुसार, ती तिच्या एका नातेवाईकाच्या लग्नात सहभागी होऊन बिहारहून कोलकाता येथे परतत होती. तिला कोलकाता जोगबानी एक्सप्रेसमध्ये वरचा बर्थ देण्यात आला होता. पण खाली सीट रिकामी होती. यादरम्यान, एका सहप्रवाशाच्या विनंतीवरून ती खालच्या सीटवर गेली.
जहाँनच्या म्हणण्यानुसार, "जेव्हा ट्रेन मालदा स्टेशनवर आली तेव्हा एका व्यक्तीसह टीसीने (TC/TT) मला झोपेतून उठवले आणि माझ्याकडे वाईट पद्धतीने चौकशी केली. त्यांनी मला सीटवरून बाजूला करत माझा मोबाईलही फेकून दिला. या घटनेनंतर मी रेल्वे पीएसकडे तक्रार दाखल केली."
"फराक्का या पुढच्या स्टेशनवर माझी तक्रार ऐकली गेली. मी सध्या पोलीस संरक्षणात आहे आणि त्यांच्या अशा वागण्याने खूप नाराज आहे. हे लोक सामान्य जनतेशी कसे वागत असतील माहीत नाही," असेही हसीन जहाँ म्हणाली.
दरम्यान, मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ यांचा विवाह 7 एप्रिल 2014 रोजी झाला होता. काही वर्षांनंतर तिने शमीवर बलात्कारासारखे गंभीर आरोपही केले आहेत. 2018 साली मोहम्मद शमीवर त्याची पत्नी हसीन जहाँने प्राणघातक हल्ला, बलात्कार, हत्येचा प्रयत्न आणि घरगुती हिंसाचाराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता. हसीन जहाँने शमी आणि त्याच्या भावावर गुन्हा दाखल केला होता. या दोघांमध्ये बराच काळ वाद सुरू होता, मात्र अद्याप घटस्फोट झालेला नाही.
मात्र शमीने हसीन जहाँने सर्व आरोप फेटाळले. मला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला असून अनेकदा मनात आत्महत्येचाही विचार आल्याचं शमीने म्हटलं होतं.