'ही आमची दोस्ती...', धोनीने बॅटवर आपल्या दुकानाचं स्टिकर लावल्याचं पाहून मित्र झाला भावूक

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) सध्या आयपीएलसाठी (IPL 2024) सराव करत आहे. यादरम्यान त्याने बॅटवर आपल्या मित्राच्या दुकानाचं नाव असलेलं स्टिकर लावलं होतं. हा फोटो समोर आल्यानंतर चाहते पुन्हा एकदा धोनीच्या प्रेमात पडले आहेत.   

शिवराज यादव | Updated: Feb 13, 2024, 05:24 PM IST
'ही आमची दोस्ती...', धोनीने बॅटवर आपल्या दुकानाचं स्टिकर लावल्याचं पाहून मित्र झाला भावूक title=

भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) सध्या आयपीएलसाठी (IPL 2024) सराव करत आहे. चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार असणारा धोनी नेट्समध्ये सराव करत असल्याचे फोटो समोर आले आहेत. पण यावेळी त्याच्या बॅटवरील नव्या स्टिकरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या स्टिकरवर 'प्राइम स्पोर्ट्स' लिहिलं आहे. पण हे कोणत्याही कंपनी किंवा ब्रँडचं प्रमोशन नाही, तर धोनीच्या बालमित्राच्या दुकानाचं नाव आहे. रांचीमध्ये धोनीचा बालमित्र परमजीत सिंग यांचं स्पोर्ट्सचं दुकान आहे. यानंतर धोनीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

धोनीच्या या कृत्याचं सर्व स्तरातून कौतुक होत असताना त्याचा बालमित्र परमजीत सिंग यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. 'आज तक'शी संवाद साधताना त्यांनी धोनीने आपल्याला विशेष भेट दिली असल्याचीही माहिती दिली. 

आयुष्यात कठीण काळात आपले मित्रच कामाला येतात. पण जेव्हा आपली चांगली वेळ येते तेव्हा त्या उपकाराची परतफेड करायची असते हे धोनीने दाखवून दिलं आहे. याचं कारण धोनीने परमजीत यांच्या मदतीमुळे 2000 च्या सुरुवातील पहिली बॅट स्पॉन्सरशिप मिळाली होती. आयपीएल 2024 धोनीचा शेवटचा हंगाम असू शकतो अशी चर्चा आहे. म्हणूनच धोनी कदाचित मैदानावरुन निरोप घेताना त्या शेवटच्या क्षणांमध्ये मित्राला शक्य ती मदत करताना दिसत आहे. मित्राच्या दुकानातील विक्री वाढावी यासाठी त्याने परमजीत यांच्या दुकानाच्या नावाचं स्टिकर बॅटवर लावलं आहे. 

धोनीच्या या कृत्यामुळे परमजीत सिंग यांनी आनंद व्यक्त केला आहे. आम्हाला जेव्हा कधी गरज लागते तेव्हा तो उपलब्ध असतो असं त्यांनी सांगितलं आहे. धोनीने यावेळी परमजीत यांनी आपली स्वाक्षरी असणारी बॅटही भेट म्हणून दिली आहे. यावर त्याने "Best wishes Chotu Bhaiya" असा संदेशही लिहिला आहे. 

"मला त्याचा फार अभिमान वाटत आहे. तो नेहमीच आमच्यासाठी उपलब्ध असतो. ही आमची मैत्री नंबर 1 आहे," असं परमजीत म्हणाले आहेत. 

धोनीच्या आय़ुष्यावर आधारित आलेल्या चित्रपटामुळे जगाला परमजीत सिंग यांची ओळख झाली होती. 'MS Dhoni: The Untold Story' चित्रपटात त्यांची मैत्री किती घट्ट आहे हे दाखवण्यात आलं होतं. तसंच त्यांनी धोनीला संघर्ष सुरु असताना कशाप्रकारे मदत केली हेदेखील दाखवलं होतं. 

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर अॅडम गिलक्रिस्ट याचंही लक्ष धोनीच्या या कृत्याने वेधून घेतलं होतं. "मी आज धोनीला नेटमध्ये सराव करताना पाहिलं. त्याच्या बॅटवर नवं स्टिकर आहे. त्याच्या शाळेतल्या मित्राच्या स्थानिक दुकानाचं ते नाव आहे. विक्रीत वाढ व्हावी यासाठी त्याने हे केलं आहे," असं गिलक्रिस्टने ऑस्ट्रेलिया-वेस्ट इंडिजमधील टी-20 सामन्यादम्यान सांगितलं.

दरम्यान 42 वर्षीय धोनीचा हा शेवटचा आयपीएल हंगाम असू शकतो. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने आतापर्यंत 5 वेळा आयपीएल जिंकली आहे.