मुंबई : बांगलादेशविरुद्धच्या टी-२० सीरिजसाठीच्या भारतीय टीममध्ये धोनीची निवड झाली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा धोनीच्या भवितव्याबाबत चर्चा सुरु झाली आहे. त्यातच आता निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आता आम्ही पुढे निघून गेलो आहेत, असं एमएसके प्रसाद म्हणाले. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीदेखील धोनीशी त्याच्या भविष्याबाबत बोलणार आहे.
बांगलादेशविरुद्धच्या सीरिजसाठी टीम निवडल्यानंतर एमएसके प्रसाद म्हणाले, 'आमचा विचार स्वच्छ आहे, आम्ही पुढे आलो आहोत. आम्ही ऋषभ पंतचं समर्थन केलं आणि त्याला चांगली कामगिरी करताना बघितलं. पंतने चांगली कामगिरी केली नाही, असं काहींना वाटत असेल. वर्ल्ड कपनंतर आम्ही तरुणांना पर्याय म्हणून बघत आहोत. आम्ही धोनीशी बोललो आहोत. त्यानेही तरुणांना संधी देण्याच्या भूमिकेशी सहमती दर्शवली.'
बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतरही सौरव गांगुलीने धोनीबाबत प्रतिक्रिया दिली होती. 'त्याच्या मनात काय चाललं आहे, हे मला माहिती नाही. भारताला धोनीचा अभिमान आहे. जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत सगळ्यांचा सन्मान ठेवला जाईल. तुम्ही धोनीचं रेकॉर्ड बघितलत तर चॅम्पियन खेळाडू एवढ्या लवकर संपत नाहीत,' असं गांगुली म्हणाला.
बांगलादेशविरुद्धच्या टी-२० सीरिजसाठी संजू सॅमसनचीही निवड झाली आहे. सॅमसनची निवड बॅट्समन म्हणून झाली आहे, तर पंत हा विकेट कीपर असेल, असं एमएसके प्रसाद यांनी स्पष्ट केलं. टी-२० सीरिजमध्ये विराटला विश्रांती देण्यात आली आहे, त्यामुळे सॅमसनला संधी मिळण्याची शक्यता आहे. इंडिया ए आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये सॅमसनने शानदार कामगिरी केली. विजय हजारे ट्रॉफीमध्ये सॅमसनने द्विशतक झळकावलं.