मुंबई : भारत-झिम्बाब्वे यांच्यातल्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने समोरच्या टीमचा धुव्वा उडवला. या सामन्यात लोकेश राहुलने बऱ्याच कालावधीनंतर कमबॅक केलंय. दरम्यान या सामन्यात कर्णधार राहुलच्या एका कृतीची चर्चा फार रंगलीये.
प्रत्येक सामन्याअगोदर दोन्ही देशांचं राष्ट्रगीत होतं. भारताचं राष्ट्रगीत सुरू होण्यापूर्वी लोकेश राहुलने असं काही केलं, की त्याच्या देशभक्तीचं कौतुक केलं जातंय.
सामना सुरु होण्यापूर्वी दोन्ही टीम्स राष्ट्रगीतासाठी मैदानावर आल्या होत्या. यावेळी जेव्हा भारताचं राष्ट्रगीत सुरु होणार होतं त्यावेळी केएल राहुलने तोंडातील च्युइंगम काढून फेकून दिलं. यानंतर त्याच्या या कृत्याचं कौतुक केलं जातंय.
Proud of you, Captain KL Rahul! pic.twitter.com/5Xuvq5mag8
— Kunal Yadav (@kunaalyaadav) August 18, 2022
टीम इंडियाने झिम्बाब्वेविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना 10 गडी राखून जिंकला आहे. या सामन्यात झिम्बाब्वेने भारतासमोर 190 धावांचे लक्ष्य ठेवले होते. शिखर धवन आणि शुभमन गिल या सलामीच्या जोडीने हे लक्ष्य सहज गाठलं. या विजयासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. शिखर धवन आणि शुभमन गिल या दोघांनीही या सामन्यात नाबाद अर्धशतके झळकावली. शिखर धवनने 113 चेंडूत 81 धावा केल्या, तर शुभमन गिलने 72 चेंडूत 82 धावा केल्या.
टीम इंडियाचा कर्णधार केएल राहुल याने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. झिम्बाब्वेचा डाव 189 धावांवर आटोपला. डावातील शेवटची विकेट अक्षर पटेलच्या नावावर होती. झिम्बाब्वेकडून रेगिस चकाबवाने 35, रिचर्ड नागरवाने 34 आणि ब्रॅड इव्हान्सने 33 धावा केल्या. त्याचबरोबर भारताकडून प्रसिद्ध कृष्णा, अक्षर पटेल आणि दीपक चहर यांनी 3-3 बळी घेतले.