ब्युरो रिपोर्ट : यावर्षी होणारी टोकयो ऑलिम्पिक वर्षभरासाठी पुढे ढकलली आहे. कोरोना व्हायरसमुळे यावर्षी ऑलिम्पिक पुढे ढकलण्याची वेळ आली आहे. त्यामुळे नव्या वेळापत्रकानुसार टोकयो ऑलिम्पिक आता २३ जुलै २०२१ रोजी सुरु होणार आहे. पण तरीही ऑलिम्पिकवरचं सावट अजून टळलेलं नाही. टोकयो ऑलिम्पिकच्या आयोजन समितीचे अध्यक्ष योशिरो मोरी यांनी मंगळवारी केलेल्या वक्तव्यातून तसे स्पष्ट होत आहे.
जपानच्या निक्कन क्रीडा दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत मोरी यांनी केलेले वक्तव्य क्रीडाप्रेमींची उत्सुकता आणखी वाढवणारे आहे. मोरी म्हणतात, जर कोरोना व्हायरसची साथ पुढच्या वर्षीपर्यंत आटोक्यात आली नाही, तर टोकयो ऑलिम्पिक रद्द करावी लागेल. टोकयो ऑलिम्पिक होणार की नाही याबाबत जपानमध्ये चर्चा सुरु असून ऑलिम्पिकचा खर्च कमी करण्यासाठीही प्रयत्न सुरु आहेत.
टोकयो ऑलिम्पिक २०२० कोरोना व्हायरसमुळे आधीच जुलै २०२१ पर्यंत पुढे ढकलावी लागली आहे. पण कोरोना व्हायरसची साथ आटोक्यात आली नाही तर ही स्पर्धा आणखी पुढे ढकलणे शक्य नाही, असं मोरी यांनी म्हटले आहे.
जर कोरोना व्हायरसची साथ पुढच्या वर्षी कायम राहिली तर टोकयो ऑलिम्पिक २०२२ पर्यंत पुढे ढकलणं शक्य आहे का? असा थेट प्रश्न विचारला असता मोरी यांनी त्याचे उत्तर ‘नाही’ असे दिले. अशा वेळी स्पर्धा रद्द झालेली असेल, असं ते म्हणाले.
याआधी जेव्हा ऑलिम्पिक स्पर्धा रद्द झाली आहे ती केवळ युद्धाच्या वेळीच. पण हे युद्ध अदृश्य शत्रुशी आहे, असं मोरी म्हणाले.
जर कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवलं गेलं तर पुढच्या उन्हाळ्यात आपण ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करू शकू. यावर आता पैजा लागत आहे, असं मोरी यांनी सांगितलं.
टोकयो ऑलिम्पिक २०२० च्या प्रवक्त्याने, स्पर्धा रद्द होण्याच्या शक्यतेबाबत बोलण्यास नकार दिला. मोरी यांनी जे वक्तव्य केले आहे ते त्यांच्या विचाराअंती केलेले आहे, असं प्रवक्ता मसा टाकाया यांनी सांगितलं.
जगभरातले खेळाडू आणि क्रीडा संघटनांच्या दबावामुळे ऑलिम्पिक आयोजक आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेनं स्पर्धा वर्षभरासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय गेल्या महिन्यात घेतला आहे. पण आता वर्षभरानंतर तरी स्पर्धा होऊ शकेल का याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कोरोना व्हायरसवरील लस उपलब्ध झाली नाही तर पुढच्या वर्षी ऑलिम्पिक स्पर्धा होणं कठीण आहे, असं जपान मेडिकल असोसिएशनच्या प्रमुखांनीही म्हटलं आहे. स्पर्धा होणारच नाही असं मी म्हणत नाही. पण ते फारत कठीण आहे, असं योशिताके कोकोकुरा यांनी पत्रकारांना सांगितलं.
जपानमधील वैद्यकीय तज्ज्ञांनीही टोकयो ऑलिम्पिक २०२१ मध्ये होण्याबाबत शंका व्यक्त केली आहे. मला वाटत नाही की २०२१ मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा होऊ शकेल, असं कोबे विद्यापीठातील प्राध्यापक केन्टारो इवाटा यांनी पत्रकारांना सांगितलं. पण टोकयो ऑलिम्पिकचे प्रवक्ते टाकाया यांनी मात्र यावर प्रतिवाद केला. ते म्हणाले, टोकयो ऑलिम्पिक रद्द होईल असं आत्ताच मानणं घाईचं ठरेल असं वैद्यकीय तज्ज्ञही सांगत आहेत.
स्पर्धेचा खर्च कमी करण्याचा प्रयत्नही आयोजक करत आहेत. या स्पर्धेतील खर्च कमी करण्यासाठी ऑलिम्पिक आणि पॅराऑलिम्पिक स्पर्धेचे उद्घाटन आणि अंतिम सोहळा संयुक्त करण्याचा विचार आयोजक करत आहेत, असं मोरी यांनी मुलाखतीत सांगितलं.
२३ जुलै २०२१ रोजी टोकयो ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यात पॅराऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळाही असेल तर सप्टेंबरमध्ये होणाऱ्या पॅराऑलिम्पिकच्या अंतिम सोहळ्यात ऑलिम्पिकचा अंतिम सोहळा आयोजित केला जाईल, असं नियोजन करण्याचा विचार आहे. याबाबत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची परवानगी अजून घेतलेली नाही असं मोरी यांनी सांगितलं.