'मी उगाच राहुल द्रविडसाठी...'; आर अश्विनने स्पष्ट सांगून टाकलं; 'तुम्ही क्रिकेटला फक्त...'

भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकी गोलंदाज आर अश्विनने (R Ashwin) आपण सोशल मीडियाचे (Social Media) फार मोठे चाहते नसल्याचं म्हटलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Jan 16, 2025, 02:59 PM IST
'मी उगाच राहुल द्रविडसाठी...'; आर अश्विनने स्पष्ट सांगून टाकलं; 'तुम्ही क्रिकेटला फक्त...' title=

भारतामध्ये क्रिकेटचं वेड किती आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. जगभरातील क्रिकेटप्रेमींना भारत आकर्षित करत असतो. याचं कारण भारत जागतिक क्रिकेटचा केंद्रबिंदू राहिला आहे. जगभरात भारतीय संघाचे 90 टक्क्यांहून अधिक चाहते आहेत. यामुळेच भारतीय क्रिकेटर्सच्या चाहच्यांची संख्याही फार मोठी असते. सचिन तेंडुलकर असो किंवा मग महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली किंवा मग रोहित शर्मा; भारतीय क्रिकेटमधील महान खेळाडूंना नेहमीच मोठ्या प्रमाणात चाहते मिळाले आहेत. दरम्यान नुकतंच निवृत्त झालेल्या फिरकी गोलंदाज आऱ अश्विनने सोशल मीडियावर दोन खेळाडूंच्या चाहत्यांमध्ये होणारं युद्ध अनेकदा धोकादायक वळण घेतं आणि हे टाळलं पाहिजे असं म्हटलं आहे. 

सध्याच्या आधुनिक जगात अनेकदा सोशल मीडियावर अत्यंत टोकाचे वाद आणि चर्चा होतात. यावरुन आर अश्विनने नाराजी जाहीर केली आहे. आर अश्विनने आपल्या युट्यूब चॅनेलवर बोलताना सांगितलं की, "सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये होणारी युद्धं ही क्लेषदायक आहेत. मी नेहमीच म्हटलं आहे की, क्रिकेटवर क्रिकेटप्रमाणेच बोललं पाहिजे. एखाद्या खेळाडूच्या ब्रँड व्हॅल्यूप्रमाणे बोलायला नको होतं. एखादा खेळाडू जास्त आवडणे याचा अर्थ दुसऱ्याला हिणवणं असा होत नाही. चाहत्यांमध्ये होणारी ही युद्धं सध्या नवा ट्रेंड आहे".

आर अश्विनने यावेळी आपण सचिन तेंडुलकरचे फार मोठे चाहते होतो असं सांगितलं आहे. पण याचा अर्थ मी राहुल द्रविड किंवा इतर कोणाबद्दल वाईट बोलणार असा होत नाही. तो म्हणाला की, "आता उदाहरण द्यायचं झालं तर मी क्रिकेट फॅन असून, सचिन तेंडुलकरचा फार मोठा चाहता होतो. याचा अर्थ मी राहुल द्रविडबद्दल वाईट बोलणार असा होत नाही. मला राहुल द्रविडही आवडतो, पण सचिन जरा जास्त आवडायचा. तसंच मी अनिल भाईंना (अनिल कुंबळे) आपला रोल मॉडेल मानतो. याशिवाय मी हरभजन सिंगकडेही आदर्श म्हणून पाहोत".

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीनंतर विशेषतः विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याभोवती वादविवाद आणि चर्चा सुरू झाली आहे. भारतीय क्रिकेटमधील हे दोन्ही दिग्गज खेळाडू न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या खराब फॉर्मनंतर, विशेषतः कसोटी क्रिकेटमध्ये त्यांचे भविष्य उज्ज्वल दिसत नाही आहे. असं असले तरी, भारतीय संघ तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याच्या प्रयत्नात असताना ही जोडी अजूनही महत्त्वाची भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे.