मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या एलिमिनेटर सामन्यात शतक झळकावणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज रजत पाटीदार सध्या चर्चेत आहे. बुधवारी लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात 28 वर्षीय फलंदाजाने 54 चेंडूत 112 धावा केल्या. रजतच्या या खेळीमुळे आरसीबीने लखनौ सुपरजायंट्सचा १४ धावांनी पराभव केला. या विजयासह, आरसीबीने क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश केला, जिथे त्यांचा सामना शुक्रवारी राजस्थान रॉयल्सशी होणार आहे.
मे मध्ये होणार होते लग्न
रजत पाटीदार आयपीएलचा नवा स्टार बनला आहे आणि त्याच्या आयुष्याशी संबंधित न ऐकलेल्या गोष्टी हळूहळू समोर येत आहेत. जर रजत आयपीएलचा 15वा सीझन खेळत नसता तर आज त्याने लग्नगाठ बांधली असती. त्याची लग्नाची तयारी ही झाली होती.
फेब्रुवारीमध्ये झालेल्या आयपीएल मेगा लिलावात रजत पाटीदार अनसोल्ड राहिला. मे महिन्यात आयपीएल दरम्यान देशात दुसरी कोणतीही स्पर्धा होणार नव्हती. अशा परिस्थितीत रजत पाटीदार यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या ब्रेकचा चांगला उपयोग करून घ्यायचा होता. रजतच्या आई-वडिलांना आपल्या मुलाने लग्न करावे अशी इच्छा होती. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते.
एप्रिलमध्ये आरसीबीने रिप्लेस म्हणून उजव्या हाताच्या फलंदाजाचा संघात समावेश केला होता. लवनीथ सिसोदियाच्या जागी त्याला संघात स्थान देण्यात आले आहे. मध्य प्रदेशच्या या खेळाडूने आरसीबी कॅम्पची निराशा केली नाही. एलिमिनेटरमध्ये शतक झळकावून रजतने आपल्या संघाला क्वालिफायर-2 मध्ये नेले.
रजत पाटीदारच्या वडिलांनी एका मुलाखतीत सांगितले की, 'आम्हाला रजतसाठी मुलगी सापडली होती. ती रतलामची होती. ९ मे रोजी लग्न करण्याचा आमचा विचार होता. आम्ही इंदूरमध्ये हॉटेलही बुक केले होते. आम्ही एक छोटासा कार्यक्रम करण्याच्या तयारीत होतो. रजत पाटीदार आता जुलैमध्ये लग्न करणार आहे. रणजी ट्रॉफी संपल्यानंतर तो या पवित्र बंधनात बांधला जाईल.
रजत पाटीदारच्या वडिलांनी सांगितले की, आम्हाला फार मोठे लग्न करायचे नव्हते. आम्ही लग्नपत्रिकाही छापली नाही. आम्ही फक्त काही पाहुण्यांसाठी हॉटेल बुक केले होते. पण आता जुलैमध्ये लग्न करण्याची तयारी आम्ही केली आहे. रजत पाटीदार आयपीएल 2022 मध्ये आरसीबीसाठी 3 ऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत आहे. त्याने 7 सामन्यात 156.25 च्या स्ट्राईक रेटने 275 धावा केल्या आहेत.