Ravi Ashwin World Record: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टेस्ट मालिकेतील पहिला कसोटी सामना (IND vs WI 1st Test) डॉमिनिका येथील विंडसर पार्क येथे सुरू आहे. पहिल्याच सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी फलंदाजांचं कंबरडं मोडलं. या सामन्यात ज्याला वारंवार डावललं जात होतं. बँचवर बसवलं जात होतं, अशा टीम इंडियाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन अश्विन (R Ashwin) याने एक खास विक्रम केला.
दोन सामन्यांच्या मालिकेतील या पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रॅथवेटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या सामन्यात आश्विनने दोन्ही सलामीच्या फलंदाजांना तंबूत पाठवलं. यावेळी आश्विनने एक नवा विक्रम केला आहे. तेजनारिन चंद्रपॉलची विकेट घेताच अश्विनने इतिहास रचला. कसोटीत पिता-पुत्र जोडीला बळी ठरविणारा अश्विन हा एकमेव भारतीय गोलंदाज ठरला आहे. तेजनारिन चंद्रपॉलला पहिल्या डावात फक्त 12 धावा करता आल्या. त्याने 44 बॉलचा सामना केला.
तेजनारिन चंद्रपॉल हा वेस्ट इंडिजचा (WI) महान खेळाडू शिवनारायण चंद्रपॉलचा मुलगा आहे. वडिलांप्रमाणे आपणही क्रिकेटर व्हावं, अशी इच्छा उराशी बाळगणाऱ्या तेजनारिन चंद्रपॉलने अखेर ऑस्ट्रेलियाविरुद्ध डेब्यू केला होता.
The moment Ravi Ashwin created history!
The first Indian to pick the wicket of father (Shivnarine) and son (Tagenarine) in Tests. pic.twitter.com/nvqXhLz0ze
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 12, 2023
दरम्यान, 2011 साली दिल्लीत वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात अश्विनने शिवनारायण चंद्रपॉलला एलबीडब्ल्यू आऊट केले होते. आता अश्विनने शिवनारायणचा मुलगा तेजनारिन चंद्रपॉलचा बोल्ड उडवलाय.
भारत (Playing XI): रोहित शर्मा (C), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, इशान किशन (WK), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज
वेस्ट इंडिज (Playing XI): क्रेग ब्रॅथवेट (C), टॅगेनारिन चंदरपॉल, रेमन रेफर, जर्मेन ब्लॅकवुड, एलिक अथानाझे, जोशुआ दा सिल्वा (WK), जेसन होल्डर, रहकीम कॉर्नवॉल, अल्झारी जोसेफ, केमार रोच, जोमेल वॉरिकन
दरम्यान, भारत आणि वेस्ट इंडिज (West Indies vs India) यांच्यात आतापर्यंत 98 कसोटी सामने झाले आहे. त्यात भारताने 22 कसोटी सामन्यांमध्ये विजय मिळवलेला आहे. तर 30 सामन्यात विंडीजने बाजी मारली आहे. 46 कसोटी सामने अनिर्णित राहिलेले आहेत.