Rohit Sharma On Stone Pelting: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या प्रेमाबद्दल एक रंजक प्रतिक्रिया नोंदवली आहे. भारतामध्ये एखाद्या प्रसिद्ध क्रिकेटपटूचं आयुष्य कसं असतं याबद्दल भाष्य केलं आहे. एका क्रिकेटपटूकडे जेवढं यश, प्रसिद्धी आणि पैसा असतो तितकेच त्याचे जीवन आव्हानात्मक असतं असं सांगायचा प्रयत्न रोहित शर्माने केला. एका वृत्तवाहिनीला आयपीएलमधील कामगिरीच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या मुलाखतीमध्ये रोहित शर्माने वाईट कामगिरी झाल्यानंतर काय भोगावं लागतं यासदर्भात भाष्य केलं. त्याचवेळी त्याने केलेलं एक विधान सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
2007 मध्ये भारतात शेवटची अशी घटना घडली होती की जेव्हा क्रिकेटपटूंना प्रत्यक्ष आयुष्यात चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागला होता. भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेमध्ये श्रीलंका आणि बांगलादेशसारख्या दुबळ्या संघाकडून मायदेशी पारतला होता. पहिल्याच फेरीत भारत स्पर्धेबाहेर फेकला गेला होता. त्यावेळेस खेळाडूंविरोधात अगदी रस्त्यावर उतरुन चाहत्यांनी आंदोलन केलं होतं. काही क्रिकेटपटूंच्या घरांवर दगडफेकही झाली होती. त्यावेळेस त्यांच्या घरांची सुरक्षा वाढवण्यात आली होती. मात्र या घटनेनंतर पुन्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात चाहत्यांचा संताप दिसून आलेला नाही.
रोहित शर्माला 'दुबई आय 103.8' या चॅनेलवर चाहत्यांच्या प्रेमासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. भारतीय संघाचा कर्णधार असणं सन्मानाची बाब आहे. मात्र त्यामधून बाहेर येणं आणि सर्वसामान्यांप्रमाणे जगणं किती कठीण आहे? चाहत्यांचं प्रेम कोणत्या हद्दीपर्यंत जाऊ शकतं, याबद्दल काय सांगशील असं विचारण्यात आलं. यावर उत्तर देताना रोहितने फार रंजक प्रतिक्रिया नोंदवली.
नक्की वाचा >> धोनीचा RCB कडून अपमान! चूक लक्षात येताच कोहली पळत CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये गेला अन्..
वाईट कामगिरी झाली तर आम्हाला चाहत्यांकडून अगदी दगडांचा माराही सहन करावा लागतो, असं रोहित म्हणाला. मात्र आपल्या घरावर आता दगडफेक करणं शक्य नाही असंही रोहित मजेत म्हणाला. मजेदार विधान कताना रोहितने, "लोक आता माझ्या घरावर दगडफेक करु शकणार नाही कारण मी आता फार उंच इमारतीमध्ये वरच्या मजल्यावर राहतो," असं हसत म्हटलं.
नक्की वाचा >> 'IPL 2025 मध्ये मुंबई इंडियन्समध्ये रोहितही नसणार अन् हार्दिकही'; माजी क्रिकेटपटू म्हणाला, 'रोहितने..'
रोहितने युरोपमधील फुटबॉलपेक्षा भारतात क्रिकेट 10 पट अधिक लोकप्रिय असल्याचंही म्हटलं. "युरोपमध्ये फुटबॉलसंदर्भात जे काही चाहत्यांचं प्रेम आहे त्याच्या 10 पट अधिक भारतीयांचं क्रिकेटवर प्रेम आहे. जेव्हा तुमच्या हिशोबाने गोष्टी घडतात तेव्हा बाहेर पडायला काही वाटत नाही. लोक तुमच्यावर प्रेम करतात, तुम्हाला पाहायला येतात. मात्र गोष्टी तुमच्या इच्छेप्रमाणे घडत नाहीत, गोष्टी कठीण होत जातात तेव्हा लोकांना तुम्ही नकोसे होता. चाहत्यांनी क्रिकेटपटूंच्या घरांवर दगडफेक केल्याचीही उदाहरणं आमच्याकडे आहेत. माझ्या घरावर दगडफेक झालेली नाही कारण मी उंच इमारतीमध्ये वरच्या मजल्यावर राहतो. माझ्या घरावर दगडफेक करण्यासाठी फार मजबूत खांदे असायला हवेत एवढ्या उंचीवर राहतो मी. मात्र असं यापूर्वी झालं आहे. मात्र या साऱ्या गोष्टींचा सामना करण्यासाठी तुम्ही तयार राहायला हवं. मी हे सर्व सहन केलं आहे. यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या अधिक कणखर होतो," असंही रोहित म्हणाला.