मुंबई : भारताची बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल याच वर्षात विवाह बंधनात अडकणार आहे. भारतीय शटलर्स सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप याच वर्षी डिसेंबर महिन्यात विवाहबंधनात अडकणार आहेत. सायना आणि कश्यप यांची निमंत्रणपत्रिका सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतेय. सायना आणि कश्यप यांनी आपल्या विवाहाच्या बातम्यांना अगोदरच दुजोरा देत आपल्या विवाहाची तारीखही घोषित केली होती.
१६ डिसेंबर हीच तारीख विवाहासाठी का निवडली? या प्रश्नाचं सायनाचं उत्तर होतं, दोघंही केवळ याच तारखेला रिकामे होते... सायना म्हणते, २० डिसेंबरला प्रीमियर बॅडमिंटन लीगमध्ये मी व्यस्त होईल तसंच टोकियो गेम्स क्वालिफायरही खेळायचंय. त्यामुळे आमच्याकडे लग्नासाठी केवळ हीच तारीख होती. प्रीमिअर बॅडमिंटन लीगसाठी सायनाला नॉर्थईस्टर्न वॉरिअर्सनं निवडलंय.
२८ वर्षीय सायना आणि ३२ वर्षीय कश्यप यांची पहिली भेट २००५ साली पुलेला गोपीचंद यांच्या अकादमीतील ट्रेनिंग दरम्यान झाली होती.
पी कश्यप नेहमीच सायना आपली चांगली पार्टनर आणि मैत्रिण असल्याचं सांगत आलाय. दोघांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एकमेकांसोबत अनेक फोटोही आहेत.
काही दिवसांपूर्वीच या दोघांनी, आपण एकमेकांना गेल्या १० वर्षांपासून डेट करत असल्याचं सार्वजनिकरित्या कबूल केलं होतं.