ढाका : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये विजय मिळवत बांग्लादेशनं क्रिकेट जगतामध्ये मोठा उलटफेर केला आहे. शाकीब उल हसननं पहिल्या इनिंगप्रमाणेच दुसऱ्या इनिंगमध्येही पाच विकेट घेतल्यामुळे बांग्लादेशचा या मॅचमध्ये २० रन्सनी विजय झाला.
चौथ्या इनिंगमध्ये २६५ रन्सचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव २४४ रन्सवर संपुष्टात आला. या टेस्टमध्ये टॉस जिंकून बांग्लादेशनं पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आणि पहिल्या इनिंगमध्ये २६० रन्सपर्यंत मजल मारली. शकीब अल हसनच्या ८४ रन्स आणि तमीम इक्बालच्या ७१ रन्समुळे बांग्लादेशनं पहिल्या इनिंगमध्ये सन्मानजनक स्कोअर केला.
त्यानंतर बॅटिंगला आलेल्या ऑस्ट्रेलियाला २१७ रन्सच बनवता आल्यामुळे बांग्लादेशला ४३ रन्सची आघाडी मिळाली. दुसऱ्या इनिंगमध्ये पुन्हा एकदा तमीम इक्बालनं ७८ रन्स आणि मुशफिकूर रहीमनी ४१ रन्स केल्यामुळे बांग्लादेशनं २२१ रन्स करून ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी २६५ रन्सचं आव्हान ठेवलं.
मॅचमध्ये ८९ रन्स आणि १० विकेट घेऊन अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या शाकीब अल हसनला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. टेस्ट क्रिकेटमधला बांग्लादेशचा हा दहावा विजय आहे. याआधी बांग्लादेशनं ५ वेळा झिम्बाब्वेला, २ वेळा वेस्ट इंडिजला, एकदा श्रीलंकेला, एकदा इंग्लंडला हरवलं आहे. मागच्या १० वर्षांमध्ये ऑस्ट्रेलियानं आशियामध्ये २३ टेस्ट खेळल्या यापैकी फक्त एका टेस्टमध्येच त्यांना जिंकता आलं.