मुंबई : श्रीलंकेत क्रिकेट जितके लोकप्रिय आहे तितकेच भारतातही आहे. श्रीलंकेच्या क्रिकेट मैदानावर एक वेदनादायक घटना घडली आहे. हंबनटोटा येथील महिंद्रा राजपक्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममधील दोन कर्मचाऱ्यांचा हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झाला. या घटनेने क्रिकेट जगताला धक्का बसला आहे.
दोन्ही कर्मचारी कामावरून घरी परतत होते. श्रीलंका क्रिकेट अधिकाऱ्यांनी सांगितले की, हंबनटोटा येथील सुरियावेवा येथील स्टेडियमच्या बाहेर मंगळवारी रात्री ही घटना घडली. जेव्हा दोन कर्मचारी त्यांचे काम संपवून त्यांच्या मोटरसायकलवरून घरी परतत होते. या दोन कर्मचाऱ्यांचे मृतदेह सुमारे 500 मीटर अंतरावर आढळून आले. एका कर्मचाऱ्याचा मृतदेह मोटारसायकलजवळ तर दुसऱ्याचा मृतदेह झुडपाजवळ आढळून आला. हत्तीच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने क्रिकेट विश्व शोकसागरात बुडाले आहे.
मरण पावलेले दोघे कर्मचारी या महिन्यात होणाऱ्या लंका प्रीमियर लीग T20 स्पर्धेच्या सामन्याच्या मैदानावर काम करत होते. हंबनटोटा येथे श्रीलंका प्रीमियर लीगचे सामने सुरू होण्याच्या एक आठवडा आधी स्टेडियमजवळ ही घटना घडली. या लीगचे एलिमिनेटर, क्वालिफायर आणि अंतिम सामने हंबनटोटाच्या मैदानावर खेळवले जातात. एलिमिनेटर आणि पहिला क्वालिफायर सामना १९ डिसेंबरला होणार आहे.
श्रीलंकेतील हंबनटोटा येथील महिंद्रा राजपक्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम २०११ मध्ये क्रिकेट विश्वचषकासाठी पूर्ण झाले. हे स्टेडियम वन्यजीव अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यानाला लागून आहे. अनेक महत्त्वाचे सामने येथे खेळले गेले. २०११ च्या विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना या स्टेडियममध्ये खेळवला जाणार होता. परंतु तो सामना मुंबईच्या वाखेडे स्टेडियमवर खेळला गेला. जो भारताने श्रीलंकेचा ६ विकेट्सने पराभव करून जिंकला. हा सामना जिंकून भारताने दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकला.