Serena Williams : 23 वेळा ग्रँडस्लॅम विजेती ठरलेली सेरेना विल्यम्स टेनिसला करणार अलविदा

 सेरेना विल्यम्सने सोशल मीडियावर पोस्ट करत आपण निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले आहे

Updated: Aug 9, 2022, 09:29 PM IST
Serena Williams : 23 वेळा ग्रँडस्लॅम विजेती ठरलेली सेरेना विल्यम्स टेनिसला करणार अलविदा title=

Serena Williams : 23 वेळा ग्रँडस्लॅम चॅम्पियन ठरलेल्या सेरेना विल्यम्स (Serena Williams) लवकरच टेनिसमधून (Tennis) निवृत्ती घेणार आहे. सेरेना विल्यम्सने मंगळवारी सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली. वर्षातील शेवटची ग्रँड स्लॅम स्पर्धा यूएस ओपननंतर टेनिस सोडण्याचा विचार करत असल्याचे विल्यम्सने म्हटले आहे. सेरेनाने 1999 मध्ये पहिल्यांदा यूएस ओपन स्पर्धा जिंकली होती.

वोगच्या सप्टेंबरच्या अंकाच्या मुखपृष्ठावर दिसल्यानंतर, टेनिस स्टार सेरेना विल्यम्सने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून तिच्या निवृत्तीची घोषणा केली. सेरेना विल्यम्सने सांगितले की, ती वर्षातील शेवटची ग्रँड स्लॅम स्पर्धा यूएस ओपननंतर टेनिसला अलविदा करणार आहे.

"मला निवृत्ती हा शब्द आवडत नाही. मी त्याला जीवनाची उत्क्रांती म्हणेन. मी पुढच्या टप्प्यावर विचार करत आहे," असे 40 वर्षीय सेरेनाने इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे.

विल्यम्स बऱ्याच काळापासून तिच्या जुन्या शैलीत टेनिस खेळताना दिसत नाही. सेरेनाने यंदाच्या विम्बल्डन ओपनमध्ये प्रवेश केला होता, पण पहिल्याच फेरीत ती बाहेर पडली होती. 

सेरेना विल्यम्सनेही तिच्या ट्विटर अकाऊंटवरही याबाबत भाष्य केले आहे.

"आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा आपल्याला वेगळ्या दिशेने जाण्याचा निर्णय घ्यावा लागतो. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर खूप प्रेम करता तेव्हा त्या वेळा नेहमीच कठीण असतात. मी टेनिसचा आनंद घेते. मात्र आता उलटी गिनती सुरू झाली आहे. मला आई होण्यावर, माझ्या अध्यात्मिक ध्येयांवर आणि शेवटी माझ्या वेगळ्या, पण तितक्याच रोमांचक, सेरेनाच्या शोधावर लक्ष केंद्रित करावे लागेल. मी येत्या काही आठवड्यांचा आनंद घेणार आहे."