मुंबई : टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यातील (world test championship final 2021) लढत रंगणार आहे. ही फायनल मॅच साऊथम्पटनमध्ये 18-22 जूनदरम्यान खेळवण्यात येणार आहे. या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपला 1 ऑगस्ट 2019 मध्ये एशेज सीरिजपासून सुरुवात झाली होती. टीम इंडिया आणि न्यूझीलंडने धमाकेदार कामगिरी करत अंतिम सामन्यात धडक मारली. या 2 वर्षांमध्ये अनेक फलंदाजांनी धमाकेदार फलंदाजी केली. या स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप 5 बॅट्समनबद्दल आपण जाणून घेणार आहोत. या 5 फलंदाजांमध्ये एका भारतीयाचाही समावेश आहे. (top 5 batsmen who scored most runs in the icc world test championship)
सर्वाधिक धावांच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाचा मार्नस लॅब्युशेन (Marnus Labuschagne) अव्वल क्रमांकावर आहे. मार्नसने 13 कसोटींमधील 23 डावांमध्ये 72.82 च्या दमदार सरासरीने 1 हजार 675 धावा केल्या आहेत. यामध्ये 5 शतक आणि 9 अर्धशतकांचा समावेश आहे.
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा कर्णधार (Joe Root) जो रुट आहे. रुटने या स्पर्धेतील 20 सामन्यातील 37 डावात त्याने 2 वेळा नाबाद राहत 1 हजार 660 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 3 शतक आणि 8 हाफ सेंच्युरी लगावल्या आहेत.
तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा (Steve Smith) स्टीव्ह स्मिथ विराजमान आहे. स्टीव्हने 13 टेस्टमधील 22 इनिंग्समध्ये 4 शतक आणि 7 अर्धशतकांच्या मदतीने तसेच 63.85 सरासरीने 1 हजार 341 धावा केल्या आहेत.
इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने (Ben Stokes) 17 कसोटींमधील 32 डावांमध्ये 4 शतक आणि 6 अर्धशतकांसह 1 हजार 334 धावा केल्या आहेत. स्टोक्सने या धावा 46 च्या सरासरीने केल्या आहेत.
सर्वाधिक धावांच्या यादीत टीम इंडियाच्या एकमेव फलंदाजाचा समावेश आहे. भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार (Ajinkya Rahane) अजिंक्य रहाणेने 17 कसोटी सामन्यातील 28 डावांमध्ये 3 वेळा नाबाद राहत 1 हजार 95 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने 3 शतक आणि 6 अर्धशतक लगावले आहेत. रहाणेने 43.8 च्या सरासरीने धावा केल्या आहेत.
टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना साऊथम्पटनमध्ये खेळणार आहे. या ठिकाणी भारताने आतापर्यंत 2 सामने खेळले आहेत. या 2 सामन्यातील 4 डावांपैकी 3 इनिंगमध्ये रहाणेने अर्धशतकी खेळी केली आहे. तसेच रहाणे इंग्लंडमध्ये शानदार फलंदाजी करतो. त्यामुळे या महत्वाच्या आणि अंतिम सामन्यात रहाणेकडून भारताला चांगल्या आणि धमाकेदार कामगिरीची अपेक्षा असणार आहे.