नवी दिल्ली : ऑल्मिपिकमध्ये भारताला 2 वेळा पदक मिळवून देणारा (Sushil Kumar) सुशील कुमार गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सुशील कुमारला पैलवान सागन धनकर (Sagar Dhankhar) मृत्यू प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी सुशीलला गजाआड केलं. पोलिसांनी सुशीलला कारागृहात डांबल्यानंतर तो जोरजोरात रडू लागला. सुशीलने पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला. सुशीलने केलेल्या कृत्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. सुशील कुमारचा ताबा सध्या मॉडल टाऊन पोलिसांकडे आहे. (two time Olympics medal winner wrestler sushil kumar cried in delhi police custody in sagar dhankhar murder case)
कारागृहातील पहिली रात्र
मॉडेल टाऊन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "पोलिस ठाण्यात पोहचताच सुशील आणि त्याचा साथीदार अजयला कोठडीत डांबण्यात आलं. कारागृहात गेल्यानंतर सुशील जोरजोरात रडू लागला. सुशीलला इतर गुन्हेगारांप्रमाणे जमिनीवर बसवण्यात आले. सुशील अधिकाऱ्यांसमोर लहान मुलांप्रमाणे रडत होता. त्यानंतर सुशीलला चौकशीसाठी विशेष अधिकाऱ्यांसमोर बसवण्यात आले."
"सुशीलने कारागृहातील पहिली रात्र जागून काढली. त्याने जेवण्यास नकार दिला. या दरम्यान तो अनेकदा रडला. सुशील केवळ 2 तासच झोपला. त्यानंतर सुशीलला पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी झोपेतून जागे करण्यात आले. यानंतर सुशीलने त्याचा साथीदार अजयसोबत जेवणही केलं", असंही पोलिसांनी सांगितलं.
नक्की प्रकरण काय?
5 मे रोजी दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये पैलवानांच्या 2 गोटात तुफान हाणामारी झाली. या राड्यात 5 जण गंभीर जखमी झाले. यामध्ये नॅशनल ज्युनिअर मेडल विजेता सागर धनकरचा समावेश होता. सागरला जबर मारहाण करण्यात आली होती. या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र सागरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे या प्रकरणात सुशील अडकला.
या प्रकरणी सुशील कुमारला 23 मे ला दिल्ली पोलिसांनी पंजाबमधून अटक केली. यासह सहकारी अजयला ही पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर या दोघांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून पोलिस सुशील आणि अजयचा शोध घेत होती. पण हे दोघे पोलिसांना सराईत गुन्हेगाराप्रमाणे चकवा देत होते. त्यामुळे पोलिसांनी सुशीलवर 1 लाख तर अजयवर 50 हजारांचे बक्षिसही जाहीर केलं होतं.
पोलिसांना हे दोघे पंजाबमध्ये असल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी या दोघांचे मोबाईल लोकेशनद्वारे शोध घेतला. या लोकेशनद्वारे पोलिसांनी दोघांना पंजाबमधून अटक केली.