पाकिस्तानवरही दक्षिण आफ्रिकेसारखाच बहिष्कार घाला

आगामी वर्ल्ड कपमधील साखळी फेरीत भारतानं पाकिस्तानविरुद्धची मॅच खेळू नये ही मागणी जोर धरु लागली आहे.

Updated: Feb 24, 2019, 05:01 PM IST
पाकिस्तानवरही दक्षिण आफ्रिकेसारखाच बहिष्कार घाला title=

मुंबई : वर्णभेदामुळे ज्याप्रकारे दक्षिण आफ्रिकेवर बहिष्कार घालण्यात आला होता. त्याप्रमाणे दहशतवादाला आणि दहशतवादी कारवाई करणाऱ्या संघटनांना खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानवरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी केली आहे. पुलवामा हल्ल्यानंतर क्रीडाक्षेत्रातातून या हल्ल्याचा पडसाद उमटले. आगामी वर्ल्ड कपमधील साखळी फेरीत भारतानं पाकिस्तानविरुद्धची मॅच खेळू नये ही मागणी जोर धरु लागली.
  
दहशतवादाला जो देश खतपाणी घालतो, अशा देशासोबत कोणत्याच देशाने संबंध ठेवू नये, यासाठी बीसीसीआयने आधीच आयसीसीला पत्रव्यवहार केला आहे, असं विनोद राय यांनी सांगितलं. या मॅचकडे फक्त एक साधारण मॅच म्हणून पाहु नये. कदाचित आपल्याला पाकिस्तान सोबत सेमी फायनल किंवा फायनल मॅच मध्ये सामना करावा लागेल, असंही विनोद राय म्हणाले. 

जर आपण पाकिस्तान सोबत खेळलो नाही तर आपणच आपल्या पायावर दगड मारुन घेतल्यासारखे होईल. आपल्याला क्रिकेट खेळणाऱ्या पाकिस्तान टीमवर बंदी घालायला हवी. हा आपला उद्देश आहे. तसेच क्रिकेट खेळणाऱ्या इतर सर्व देशांना पाकिस्तान सोबत संबंध तोडायला हवेत. अशी प्रतिक्रिया राय यांनी दिली. 

विनोद राय उदाहरण देताना म्हणाले की,  '१९७० ते १९९१ या २१ वर्षांच्या कालावधीत वर्णभेदी नितीमुळे दक्षिण आफ्रिकेवर प्रतिबंध घालण्यात आला होता. या पद्धतीचीच कारवाई पाकिस्तानवर करायला हवी असे मला वाटते. पाकिस्तानला सर्व क्रीडा स्पर्धेसाठी प्रतिबंधित करायला हवे, जसे दक्षिण आफ्रिकेला केले होते'.

वरील सर्व मुद्दे आयसीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बैठकीत ठेवले जातील. या सर्व मुद्द्यांचा उल्लेख बैठकीच्या मुख्य मुदद्यांमध्ये नव्हता. पण आता बीसीसीआयनं औपचारिक रित्या पत्र व्यवहार केला असून, वरील सर्व मुद्द्यांवर चर्चा केली जाणार असल्याचं विनोद राय यांनी सांगितलं.