पल्लीकल : श्रीलंकेविरुद्धच्या दुस-या वनडे सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीला आणखी पाच नवीन विक्रम आपल्या नावे करण्याची संधी आहे.
जयसूर्याचा रेकॉर्ड मोडण्याची संधी
भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये २८ शतके आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकवणा-या खेळाडूंच्या यादीत कोहली श्रीलंकेचा माजी फलंदाज सनथ जयसुर्यासह तिस-या स्थानावर आहे. पाल्लीकल वनडेमध्ये कोहलीने शतक झळकावले तर, कोहली जयसुर्याच्या पुढे निघून जाईल. कोहलीचे तिसरे स्थान कायम राहिल तर, जयसुर्या चौथ्या स्थानावर जाईल. वनडेमध्ये सर्वाधिक शतके सचिन तेंडुलकरच्या नावावर आहेत. सचिन 49 शतकांसह पहिल्या तर, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग 30 शतकांसह दुस-या स्थानावर आहे.
एकाच संघाविरोधात 2 हजार धावा
विराट कोहलीने 190 वनडेमध्ये 8,339 धावा केल्या आहेत. कोहलीने आतापर्यंत कुठल्याही एका देशाविरोधात 2 हजार धावा केलेल्या नाहीत. पण कोहलीला श्रीलंकेविरुद्ध अशा कामगिरीची नोंद करण्याची संधी आहे. कोहलीने श्रीलंकेविरुद्ध आतापर्यंत 42 सामन्यात 41 डावात 1,938 धावा केल्या आहेत. त्याला 2 हजार धावा पूर्ण करण्यासाठी 62 धावांची आवश्यकता आहे.
नंबर 1 बनू शकतो विराट
वर्ष 2017 मध्ये कोहलीने 14 वनडे सामन्यात 769 धावा केल्या असून, तो तिस-या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा फाफ डु प्लेसी 814 धावांसह पहिल्या स्थानावर आहे. कोहलीला पहिले स्थान मिळवण्यासाठी फक्त 46 धावांची आवश्यकता आहे.
षटकारांचे द्विशतक करण्याची संधी
विराटच्या नावावर 190 वनडेमध्ये 192 षटकारांची नोंद आहे. त्याला शंभर षटकारांचे द्विशतक पूर्ण करण्यासाठी आणखी आठ षटकारांची गरज आहे. विराटने आजच्या सामन्यात ही कामगिरी केली तर, अशी कामगिरी करणारा तो जगातील 32 वा फलंदाज असेल. भारताकडून एमएमस धोनी (208), सचिन तेंडुलकर (195), सौरव गांगुली (190), युवराज सिंह (155), विरेंद्र सेहवाग (136), रोहित शर्मा (124) आणि सुरेश रैनाने (120) षटकार लगावले आहेत.
800 चौकार पूर्ण करण्याची संधी
आजच्या सामन्यात विराटला 800 चौकार पूर्ण करण्याची संधी आहे. विराटने आतापर्यंत 776 चौकार लगावले असून, अजून 24 चौकारांची आवश्यकता आहे. अशी कामगिरी करणारा विराट 19 वा क्रिकेटपटू बनू शकतो. आज विराटने नऊ चौकार ठोकले तर तो मोहम्मद युसूफ (785) आणि ग्रॅमी स्मिथ (788) यांना मागे सोडू शकतो.