मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहली इंग्लंड दौऱ्याच्या तयारीला लागला आहे. जूनमध्ये विराट कोहली सरे काऊंटीकडून खेळणार आहे. आयपीएलमध्ये विराटच्या नेतृत्वात खेळणाऱ्या बंगळुरूचं आव्हान ग्रुप स्टेजमध्येच संपुष्टात आलं आहे. त्यामुळे आता काही दिवस आराम करून विराट इंग्लंडला रवाना होईल. काऊंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतल्यामुळे विराट अफगाणिस्तानविरुद्धची टेस्ट खेळू शकणार नाही. १४ जूनला भारत आणि अफगाणिस्तानमध्ये बंगळुरूत एकमेव टेस्ट होणार आहे. अफगाणिस्तानची ही पहिलीच टेस्ट असणार आहे. सरेकडून खेळताना विराट कोहली नव्या कर्णधाराबरोबर खेळणार आहे. सरेकडून खेळताना रोरी बर्न्स हा विराटचा कर्णधार असेल. रोरी बर्न्सनं ९६ प्रथम श्रेणी मॅचमध्ये ४८.४३ च्या सरासरीनं ६,५४८ रन केल्या आहेत. यामध्ये १२ शतकं आणि ३५ अर्धशतकांचा समावेश आहे. डावखुरा बॅट्समन असलेला रोरी बर्न्स ४२ व्या प्रथम श्रेणी मॅचमध्ये सरेचं प्रतिनिधीत्व करेल. यामध्ये रोरी बर्न्सनं ३६.३१च्या सरासरीनं १२७१ रन बनवले आहेत.
इंग्लंड दौऱ्यामध्ये भारत ३ टी-20, ३ वनडे आणि ५ टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. इंग्लंड दौऱ्याआधी भारत आयर्लंडविरुद्ध दोन टी-20 खेळणार आहे. २७ आणि २९ जूनला या मॅच होणार आहेत.
यावर्षी काऊंटी क्रिकेट खेळणारा विराट कोहली चौथा भारतीय आहे. चेतेश्वर पुजारा यॉर्कशायरकडून, इशांत शर्मा ससेक्सकडून आणि वरुण एरॉन लेसिस्टशायरकडून क्रिकेट खेळत आहेत. सरेकडून काऊंटी खेळणारा विराट हा सहावा भारतीय आहे. याआधी जहीर खाननं २००४ साली, हरभजननं २००५ आणि २००७ साली, अनिल कुंबळेनं २००६ साली, प्रग्यान ओझानं २०११ साली आणि मुरली कार्तिकनं २०१२ साली सरेचं प्रतिनिधीत्व केलं होतं.
२०११ साली टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या विराटनं ५३.४० च्या सरासरीनं ५५५४ रन केल्या आहेत. तर वनडेमध्ये विराटनं ५८.१० च्या सरासरीनं ९५८८ रन केल्या आहेत.
विराट कोहली इंग्लंडच्या २०१४ सालच्या दौऱ्यात अपयशी ठरला होता. या दौऱ्यामध्ये विराटला एकही अर्धशतक बनवता आलं नव्हतं. २००७ सालानंतर भारताला इंग्लंडमध्ये एकही टेस्ट सीरिज जिंकता आलेली नाही. विराटच्या नेतृत्वात जर भारत इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकला तर ११ वर्षातला हा पहिलाच सीरिज विजय असेल. याआधी २००७ साली राहुल द्रविडच्या नेतृत्वात भारतानं इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकली होती. तेव्हा २१ वर्षानंतर भारतानं इंग्लंडमध्ये हा विजय मिळवला होता. भारतानं इंग्लंडमध्ये आत्तापर्यंत १७ टेस्ट सीरिज खेळल्या आहेत. यापैकी ३ वेळा सीरिज जिंकण्यात यश आलं आहे तर एक सीरिज ड्रॉ झाली आहे. उरलेल्या सगळ्या टेस्ट सीरिज इंग्लंडनं जिंकल्या आहेत.