Ind vs WI Utter Confusion Due To Bizarre Reason: भारत आणि वेस्ट इंडीजदरम्यान मंगळवारी गयाना येथे खेळवण्यात आलेल्या सामन्याच्या सुरुवातीलाच गोंधळ झाल्याचं पहायला मिळालं. अगदीच विचित्र कारणामुळे हा सामना उशीरा सुरु झाला. यजमान संघाचा कर्णधार रोव्हमॅन पॉवेलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दोन्ही संघातील खेळाडू मैदानामध्ये उतरले. भारताचा कर्णधार हर्दिक पंड्या गोलंदाजीला सुरुवात करणार हे स्पष्ट झालं. अगदी काही क्षणांमध्ये सामना सुरु होणार असं वाटत असतानाच अचानक दोन्ही संघाचे खेळाडू मैदानातून बाहेर जाऊ लागले. अचानक सर्वजण मैदान का सोडून जाऊ लागले असा प्रश्न मैदानात उपस्थित असलेल्या लोकांबरोबरच समालोचकांना पडला.
गोलंदाजीसाठी हार्दिक पंड्या अगदी बॉल हातात घेऊन उभा होता. आधीच्या सामन्यांमध्येही त्यानेच भारतासाठी पहिल्या षटकात गोलंदाजी केली होती. हार्दिकने रनअप घेण्यासाठी पोहोचला. तर दुसरीकडे वेस्ट इंडीजचे सलामीवीर ब्रॅण्डन किंग आणि केली मायरस हे दोघेही फलंदाजीसाठी तयार होते. मात्र अचानक कॅमेरा मैदानातील सीमेरेषेजवळ असलेल्या मैदान व्यवस्थापनाच्या कर्मचाऱ्यांवर पॅन झाला. हे कर्मचारी मैदानातील पंचांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करताना काही इशारे करताना दिसले. सामन्यातील पंच रिची रिचर्ड्सन यांनी या कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर सर्व खेळाडू मैदानातून बाहेर जाऊ लागले. नंतर हा संपूर्ण प्रकार मैदानामध्ये 30 यार्डचं सर्कल काढण्यास कर्मचारी विसरल्याने झाल्याचं समोर आलं. हेच सर्कल काढण्यासाठी खेळाडू मैदानातून बाहेर गेल्याचं समालोचकांनी सांगितलं.
नक्की वाचा >> विराट-रोहितलाही जे जमलं नाही ते सूर्याने करुन दाखवलं! जगातील केवळ दुसरा खेळाडू ज्याने...
"तुम्ही हा असा प्रकार कधी पाहिला आहे का?" असा प्रश्न समालोचकांनीच विचारला. त्यावर दुसऱ्या समालोचकाने, "रात्री फार वेळ कोणतरी जागं होतं," असं म्हणत मैदानातील व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांना खोचक टोला लगावला. मात्र सुदैवाने आपली चूक या कर्मचाऱ्यांना लवकर लक्षात आली. त्यांनी तातडीने ती सुधारण्यासाठी आणि हे सर्कल काढण्यासाठी मैदानात धाव घेतली. मात्र यासाठी किमान 10 मिनिटं त्यांना लागली. त्यामुळेच हा सामना 10 ते 12 मिनिटं उशीराने सुरु झाला.
— Nihari Korma (@NihariVsKorma) August 8, 2023
भारताने तिसऱ्या टी-20 मध्ये यजमानांना 7 गडी राखून पराभूत केलं. 5 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना जिंकून भारताने मालिका 1-2 वर आणली आहे. तिसऱ्या सामन्यामध्ये भारताचा मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादवला लय गवसल्याचं पहायला मिळालं. सूर्यकुमारने 44 चेंडूंमध्ये 10 चौकार आणि 4 षटकारांसहीत 83 धावांची खेळी केली. वेस्ट इंडीजविरुद्ध कोणत्याही भारतीय फलंदाजाने नोंदवलेली ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली. सूर्यकुमारला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला.