मुंबई : भारताचा क्रिकेटपटू ऋषभ पंत गेल्या काही दिवसांपासून फॉर्मसाठी झगडत आहे. चुकीच्या वेळी चुकीचे शॉट मारल्यामुळे ऋषभ पंतवर जोरदार टीका होत आहे. टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही पंतच्या शॉट निवडीवर नाराजी व्यक्त केली आहे. तर सुनिल गावसकर, ब्रायन लारा आणि व्हीव्हीएस लक्ष्मण सारख्या खेळाडूंनी पंतला खालच्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवावं, अशी मागणी केली आहे. त्यातच आता ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांनी पंतवर निशाणा साधला आहे.
'पंतकडून होत असलेल्या चुका इतर युवा क्रिकेटपटूंपेक्षा वेगळ्या कशा? हे मोठ्या लोकांचं क्रिकेट आहे. मला माहिती आहे तो युवा आहे, पण त्याला हे सत्य जाणून घ्यायची गरज आहे. पंतला त्याच्या ऑफ साईडचा खेळ सुधारावा लागेल,' असं ट्विट डीन जोन्सनी केलं आहे.
ऋषभ पंतवर कारण नसताना निशाणा साधला जात आहे, असं वक्तव्य युवराज सिंगने केलं होतं. त्यावरच डीन जोन्स यांनी प्रतिक्रिया दिली आहे. २१ वर्षांच्या ऋषभ पंतने ११ टेस्ट, १२ वनडे आणि २० टी-२० मॅच खेळल्या आहेत.
'ऋषभ पंतबाबत ज्या गोष्टी बोलल्या जात आहेत, त्या योग्य नाही. या सगळ्यातून बाहेर येण्यासाठी पंतला कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या समर्थनाची गरज आहे. या दोघांनी पंतशी चर्चा करावी आणि या दबावातून बाहेर काढण्यात मदत करावी,' असं युवराजने सांगितंल.
ऋषभ पंतला वनडे क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकावर खेळवलं जात आहे. या क्रमांकावर पंतने ८ मॅच खेळल्या आहेत. यातल्या फक्त एका मॅचमध्येच त्याला ३५ रनचा आकडा पार करता आला. चौथ्या क्रमांकावर पंतचा सर्वाधिक स्कोअर ४८ रन आहे. तसंच टी-२० क्रिकेटमध्ये पंत ११ वेळा चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला आला. यातल्या ७वेळा पंतला १० रनचा आकडाही पार करता आला नाही.