IND vs ENG 2nd Test: इंग्लंड विरूद्ध भारत यांच्यात सध्या 5 सामन्यांची टेस्ट सिरीज खेळवली जातेय. या सिरीजमधील पहिल्या सामन्यात मात्र भारताला इंग्लंडकडून 28 रन्सने पराभव स्विकारावा लागला आहे. या सामन्यात टीम इंडियाचे फलंदाज फेल गेलेले ठरले. अशातच टीम इंडियाचे ओपनर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनाही साजेसा खेळ दाखवता आला नाही. यावेळी शुभमन गिलच्या खेळावर प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसतंय. 2 तारखेपासून होणाऱ्या दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडिया विजय मिळवून सिरीजमध्ये बरोबरी साधण्याचा प्रयत्न करणार आहे. यावेळी माजी खेळाडूने रोहित शर्माला खास सल्ला दिला आहे.
टीम इंडियाचा माजी फलंदाज वसीम जाफरने रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांची बॅटींग ऑर्डर बदलावी असा सल्ला दिला आहे. यामुळे टीमला चांगला फायदा होऊ शकतो, असं जाफरचं मत आहे.
वसीम जाफरने रोहित शर्माला दुसऱ्या टेस्ट सामन्यात डावाची ओपनिंग करण्याऐवजी तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याचा सल्ला दिला आहे. जाफरने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर लिहिलंय की, "माझ्या मते, दुसऱ्या टेस्ट सामन्यात शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांनी डावाची ओपनिंग करावी. तर टीमचा कर्णधार रोहितने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करावी."
जाफरच्या म्हणण्यानुसार, "फलंदाजीसाठी खाली उतरणं शुभमनच्या फायद्याचं नाही. गिलने डावाची सुरुवात करणंच चांगलं होईल. रोहित स्पिन गोलंदाजीसमोर चांगली खेळी करतो. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणं त्याच्यासाठी फारसं चिंतेची गोष्ट ठरणार नाही.
पहिल्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाचा स्टार खेळाडू शुभमन गिलकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र या सामन्यात गिलला साजेसा खेळ करता आला नाही. टेस्टमध्ये गिलचा फ्लॉप शो सुरुच असल्याचं दिसून येतंय. टेस्ट क्रिकेटमध्ये बऱ्याच दिवसांपासून 'आउट ऑफ फॉर्म' आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलपासून गिलने क्रिकेटच्या या फॉरमॅटमध्ये एकही अर्धशतक झळकावलेलं नाही. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही गिलची बॅट शांत होती. त्यावेळी त्याने 4 डावांत केवळ 74 रन्स केले होते.
टीम इंडियाला पहिल्या टेस्ट सामन्यात इंग्लंडकडून 28 रन्सने पराभव स्वीकारावा लागला होता. हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात 231 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना संपूर्ण टीम इंडिया 202 रन्सवर गडगडली. टीम इंडियाची फलंदाजी दुसऱ्या डावात खराब झाली. त्यामुळे आता चाहत्यांची नजर दुसऱ्या टेस्ट सामन्यावर असणार आहे.