बर्मिंघम : वर्ल्ड कप २०१९ मध्ये इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारत फायनलमध्ये दिमाखात धडक मारली आहे. ऑस्ट्रेलियाने ठेवलेल्या २२४ रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा ८ विकेटने दणदणीत विजय झाला. ऑस्ट्रेलियाचं हे आव्हान इंग्लंडने ३२.१ ओव्हरमध्ये पूर्ण केलं.
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात धमाक्यात झाली. जेसन रॉय आणि जॉनी बेयरस्टो यांच्यात १२४ रनची पार्टनरशीप झाली. जॉनी बेयस्टो ४३ बॉलमध्ये ३४ रन करून आऊट झाला. तर जेसन रॉयने ६५ बॉलमध्ये ८५ रनची अफलातून खेळी केली. अंपायर कुमार धर्मसेनाच्या चुकीच्या निर्णयाचा फटका जेसन रॉयला बसला. यानंतर मात्र इंग्लंडच्या बॅट्समननी एकही विकेट दिली नाही. जो रूटने ४६ बॉलमध्ये नाबाद ४९ रन आणि कर्णधार इयन मॉर्गनने ३९ बॉलमध्ये नाबाद ४५ रन केले. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्सला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली.
रविवारी १४ जूलैला वर्ल्ड कपची फायनल मॅच खेळली जाणार आहे. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातला सामना रंगणार आहे. यंदाच्यावेळी क्रिकेटला नवा विश्वविजेता मिळणार आहे. कारण या दोन्ही टीमना अजून एकदाही वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही.
या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंचने या मॅचमध्ये टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. पण हा निर्णय ऑस्ट्रेलियाला चांगलाच महागात पडला. इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा २२४ रनवर ऑल आऊट केलं.
ऑस्ट्रेलियाची अवस्था १४/३ अशी झाली होती. कर्णधार एरॉन फिंच पहिल्याच बॉलला तर डेव्हिड वॉर्नर ९ रनवर आणि पीटर हॅण्ड्सकॉम्ब ४ रनवर आऊट झाले होते. पण यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि ऍलेक्स कॅरीने ऑस्ट्रेलियाची इनिंग सांभाळली.
स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक ८५ रन केले, तर ऍलेक्स कॅरी ४६ रन करून माघारी परतला. जॉस बटलरने स्टीव्ह स्मिथला रन आऊट घेतलं. ग्लेन मॅक्सवेलने २२ रन करून आणि मिचेल स्टार्कने २९ रन करून स्मिथला मदत केली. पण ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं.
इंग्लंडकडून क्रिस वोक्स आणि आदिल रशीदने प्रत्येकी ३-३ विकेट घेतल्या, तर जोफ्रा आर्चरला २ विकेट घेण्यात यश आलं. मार्क वूडला १ विकेट मिळाली. वोक्सने सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियाला दोन धक्के दिले आणि यातून ऑस्ट्रेलिया सावरू शकली नाही.