मुंबई : क्रिकेट वर्ल्ड कपला ३० मेपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होणार आहे. क्रिकेटच्या इतिहासात आत्तापर्यंत सर्वाधिक ५ वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत. यापाठोपाठ भारत आणि वेस्ट इंडिजने २ वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवला आहे. भारतीय टीमला तिसरा वर्ल्ड कप पटकवायचा असेल तर तीन खेळाडूंवर सगळी भिस्त असेल. रोहित शर्मा, शिखर धवन आणि विराट कोहली या तिघांची कामगिरी सर्वोत्तम झाली, तर भारताचं वर्ल्ड कप विजयाचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं.
मागच्या ४ वर्षांमध्ये भारताच्या टॉप ऑर्डरने मिडल ऑर्डरपेक्षा तब्बल ६,०३० रन जास्त केल्या आहेत. या कालावधीमध्ये भारताच्या टॉप ऑर्डरने ४५ शतकं तर मिडल ऑर्डरने फक्त ६ शतकं केली आहेत. भारताच्या सुरुवातीच्या तीन बॅट्समननी ६७ अर्धशतकं तर मिडल ऑर्डरने ३५ अर्धशतकं केली आहेत.
मागच्या ४ वर्षांमध्ये भारताने ८६ मॅचपैकी ५६ मॅचमध्ये विजय मिळवला. याचं प्रमुख कारण भारताच्या सुरुवातीच्या तीन बॅट्समनची उत्कृष्ट कामगिरी. या कालावधीत भारताने टॉप ऑर्डरमध्ये १४ बॅट्समन वापरले आहेत. या सगळ्या बॅट्समननी मिळून १३,०५५ रन केले. मिडल ऑर्डरमधल्या २४ बॅट्समनना फक्त ७,०२५ रनच करता आल्या.
विराट कोहली या काळात भारताचाच नाही तर जगातला सर्वोत्तम बॅट्समन राहिला. कोहलीने ४ वर्षात ६५ मॅचमध्ये ८३.७६ च्या सरासरीने आणि ९८.५४ च्या स्ट्राईक रेटने ४,२७२ रन केले आहेत. यामध्ये १९ शतकं आणि १६ अर्धशतकांचा समावेश आहे. मागच्या ४ वर्षात ४ हजार पेक्षा जास्त रन करणारा कोहली हा टॉप ऑर्डरमधला एकमेव बॅट्समन आहे.
विराटनंतर या यादीमध्ये रोहित शर्माचा क्रमांक येतो. रोहितने मागच्या ४ वर्षात ७१ मॅचमध्ये ६१.१२ च्या सरासरीने ३,७९० रन केले आहेत. यामध्ये १५ शतकं आणि १६ अर्धशतकं आहेत. रोहितचा जोडीदार शिखर धवनने ६७ मॅचमध्ये ४५.२० च्या सरासरीने २,८४८ रन केले यामध्ये ८ शतकं आणि १५ अर्धशतकं आहेत.
भारतीय टीममध्ये केएल राहुलचीही निवड झाली आहे. मागच्या ४ वर्षात केएल राहुलने टॉप ऑर्डरमध्ये बॅटिंग करताना ९ मॅचमध्ये ३१० रन केले, यामध्ये एक शतक आणि २ अर्धशतकं आहेत. पण मिडल ऑर्डरमध्ये खेळताना राहुलला ५ मॅचमध्ये फक्त ३३ रन करता आल्या.
मिडल ऑर्डर म्हणजेच ४ ते ७ क्रमांकावर भारताची जबाबदारी धोनीवर असेल. मागच्या वर्ल्ड कपनंतर धोनीने ७९ मॅचमध्ये ४४.४६ च्या सरासरीने २००१ रन केले आहेत, यामध्ये एक शतक आणि १३ अर्धशतकं आहेत. धोनीशिवाय केदार जाधवने ५८ मॅचमध्ये १,१५४ रन केले. धोनी आणि जाधव वगळता कोणत्याच भारतीय बॅट्समनला एक हजार रनचा टप्पा ओलांडता आला नाही.
भारतीय टीमचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी वर्ल्ड कपदरम्यान कोहली चौथ्या क्रमांकावर खेळेल असे संकेत दिले. पण आकड्यांकडे बघितलं तर भारतासाठी हा निर्णय घोडचूक ठरू शकतो. मागच्या ४ वर्षांमध्ये कोहलीने ४ वेळा चौथ्या क्रमांकावर बॅटिंग केली. यामध्ये त्याला फक्त ३४ रनच करता आल्या.
या ४ वर्षांमध्ये हार्दिक पांड्याने ४१ मॅचमध्ये ६४१ रन, दिनेश कार्तिकने १९ मॅचमध्ये ३८१ रन आणि रवींद्र जडेजाने १७ मॅचमध्ये १७२ रन केले. विजय शंकर मागच्याच वर्षी भारतीय टीममध्ये आला. त्याने ९ मॅचमध्ये १६५ रन केले.