World Cup 2023 Ben Stokes On England Form: वर्ल्ड कप 2023 च्या स्पर्धेमध्ये भारत हा सेमीफायलनसाठी पात्र ठरणारा पहिला संघ ठरला आहे. तर स्पर्धेमधून बाहेर पडणारा पहिला संघ ठरण्याची नामुष्की बांगलादेशच्या संघावर ओढावली आहे. बांगलादेशप्रमाणेच स्पर्धेमधून जवळपास बाहेर पडलेला संघ म्हणजे इंग्लंडचा संघ! विद्यमान जग्गजेता संघ असलेल्या इंग्लंडसाठी यंदाचा वर्ल्ड कप हा एखाद्या भयान स्वप्नाप्रमाणे ठरला आहे. इंग्लंडचा संघ हा सध्या पॉइण्ट्स टेबलमध्ये तळाशी आहे. इंग्लंडच्या संघाला अगदी अफगाणिस्ताननेही पराभूत करण्याचा पराक्रम यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये करुन दाखवला आहे. एखाद्या वाईट स्वप्नाप्रमाणे हा वर्ल्ड कप विसरण्याचा इंग्लंडच्या संघाचा प्रयत्न असेल. मात्र दुसरीकडे नेमकी इंग्लंडच्या संघाची चूक कधी आणि कुठे तसेच कशी झाली याबद्दल आजी-माजी क्रिकेटपटू, समालोचक आणि विश्लेषक चर्चा करताना दिसत आहेत. मात्र हाच प्रश्न इंग्लंडच्या संघातील स्फोटक अष्टपैलू खेळाडू असलेल्या बेन स्ट्रोक्सला विचारण्यात आला असता त्याने अगदी स्पष्टपणे केवळ 4 शब्दांमध्ये इंग्लंडच्या या कामगिरीचं विश्लेषण केलं आहे.
वर्ल्ड कपमधील 48 पैकी 34 व्या सामन्यानंतर म्हणजेच अफगाणिस्तान विरुद्ध नेदरलॅण्ड सामन्यानंतर इंग्लंडचा संघ पॉइण्ट्स टेबलमध्ये तळाशी आहे. इंग्लंडचा संघ 6 पैकी केवळ 1 सामना जिंकला आहे. त्यांच्या नावावर 5 पराभव असून त्यांचा नेट रन रेट उणे 1.652 इतका आहे. आता 2024 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र होण्याचं आव्हान इंग्लंडसमोर असून यासाठी त्यांना अव्वल 7 मध्ये स्थान मिळवावं लागणार आहे.
इंग्लंडच्या या कामगिरीवर बरीच चर्चा सुरु असताना पत्रकारांनी थेट संघाचा भाग असलेल्या बेन स्ट्रोक्सला याबद्दल प्रश्न विचारला. इंग्लंडच्या संघाबरोबर नेमकं काय चुकतंय हे कोणीच सांगू शकत नाही अशी स्थिती आहे. कोणालाच काही कळत नाही हीच मोठी अडचण आहे असं वाटतंय का? या प्रश्नाला बेन स्ट्रोक्सने 'We Have Been Crap' अशा 4 शब्दांमध्ये उत्तर दिलं. "नाही, मला नाही वाटतं असं. माझ्यामते मूळ अडचण ही आहे की आम्ही फार वाईट दर्जाचा खेळ केला आहे," असं बेन स्ट्रोक्स म्हणाला.
या दौऱ्यातील एखादी मजेदार किंवा समाधानकारक क्षण कोणता आहे? तू म्हणाला आहेस की सारं काही वाईट राहिलं. पण तरीही तुला काही मजेदार किंवा समाधानकारक वाटलेला एखादा क्षण आहे का? असा प्रश्न बेन स्ट्रोक्सला विचारण्यात आला. हा प्रश्न ऐकून बेन स्ट्रोक्स क्षणभर शांत बसला. काही क्षण विचार केल्यानंतर बेन स्ट्रोक्सने, "मला माफ करा मी या प्रश्नासाठी तयार नव्हतो. मला उद्या पुन्हा हे विचारा. त्यावेळ माझ्याकडे तुम्हाला सांगण्यासारखं काहीतरी असेल," असं उत्तर हसत दिलं.
"The problem is that we've been crap."
Ben Stokes isn't sugar-coating England's World Cup form #CWC23 pic.twitter.com/V81TnmTxy9
— cricket.com.au (@cricketcomau) November 3, 2023
इंग्लंडच्या संघाने 2019 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड कप 2019 चा अंतिम सामना टाय झाल्यानंतर सर्वाधिक चौकारांच्या विचित्र नियमानुसार जिंकला होता.