World Cup 2023 : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारताला मानहानीकारक पराभव स्विकारावा लागला होता. 19 नोव्हेंबर रोजी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 गडी राखून पराभव केला आणि सहाव्यांदा विश्वविजेता बनला. सलग 10 सामने जिंकून अंतिम फेरीत पोहोचलेल्या भारतीय संघाच्या पराभवाने संपूर्ण देशाला धक्का बसला होता. मात्र आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अंतिम सामन्याबाबत दिलेल्या अहवालामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यातील पराभवाची अनेक कारणे सांगितली जात होती. त्यामध्ये नरेंद्र मोदी स्टेडिअममधील पीचवरुनही टीका करण्यात येत होता. आता आयसीसीने या खेळपट्टीबाबत मोठा खुलासा केला आहे. या स्टेडिअमवरील खेळपट्टीचे रेटिंग आता समोर आले आहे. आयसीसीने हे रेटिंग जाहीर केले आहे. आयसीसीच्या तज्ज्ञांनी वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यासाठी तयार केलेल्या खेळपट्टीला अॅव्हरेज रेटिंग दिले आहे. या मैदानाव्यतिरिक्त, कोलकात्याच्या ईडन गार्डन्स येथील ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या उपांत्य सामन्याच्या खेळपट्टीलाही व्हरेज रेटिंग देण्यात आले आहे.
आयसीसीचे सामनाधिकारी आणि झिम्बाब्वेचे माजी फलंदाज अँडी पायक्रॉफ्ट यांनी मैदानाच्या खेळपट्टीचे वर्णन खूप चांगले असे केले आहे. तर अंतिम सामन्यासाठी तयार करण्यात आलेली खेळपट्टी अतिशय संथ होती, असे आयसीसीचे म्हणणे आहे. अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा सहा विकेट्स राखून पराभव करून विजेतेपद पटकावले. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ 50 षटकांत केवळ 240 धावाच करू शकला. ऑस्ट्रेलियाने हे लक्ष्य 43 षटकांत पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने 120 चेंडूत 137 धावांची शानदार खेळी केली होती.
आयसीसीने भारतीय संघाने खेळलेल्या पाच सामन्यांमधलल्या खेळपट्टीला अॅव्हरेज रेटिंग दिले आहे. अंतिम सामन्याव्यतिरिक्त कोलकात्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध, लखनऊमध्ये इंग्लंडविरुद्ध, अहमदाबादमध्ये पाकिस्तानविरुद्ध आणि चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यांच्या खेळपट्ट्यांनाही अॅव्हरेज रेटिंग देण्यात आले आहे. मात्र, दुसऱ्या उपांत्य फेरीतील भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याच्या खेळपट्टीला आयसीसीने चांगले रेटिंग दिले आहे. वानखेडेवरील या खेळपट्टीवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यामध्ये भारताच्या पराभवाचे मुख्य कारण ही खेळपट्टी असल्याचे बोलले जात होते. ज्यावर आयसीसीनेही मोहर उमटवली आहे. आयसीसीने ही खेळपट्टीचे वर्णन सरासरी असे करत ती खूप संथ होती असं म्हटलं आहे. भारताच्या पराभवानंतरही खेळपट्टीबाबत जोरदार चर्चा झाली होती. भारताने फायनलसाठी संथ खेळपट्टीचा वापर केला आणि ही सर्वात मोठी चूक ठरली. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी भारतीय खेळाडूंना मोकळेपणाने खेळू दिले नाही आणि भारताला केवळ 240 धावा करता आल्या.
दरम्यान, वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर लगेचच ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने खेळपट्टीबाबत मोठे वक्तव्य केले होते. सामन्यासाठी तयार करण्यात आलेली खेळपट्टी भारताच्या बाजूने उलटली, असे रिकी पाँटिंग म्हणाला होता.