Rachin Ravindra At Grandparents Home In Bengaluru: न्यूझीलंडचा सलामीवर रचिन रविंद्रसाठी त्याच्या कारकिर्दीमधील पहिलाच वर्ल्ड कप अविस्मरणीय ठरत आहे. आपल्या दमदार खेळीच्या जोरावर रचिनने या पदार्पणाच्या वर्ल्ड कपमध्ये आपल्या फलंदाजीबरोबरच गोंलादाजीची छाप सोडली आहे. न्यूझीलंडसाठी सेमी फायनलमध्ये आव्हान टीकवण्यासाठी आवश्यक असलेल्या करो या मरोच्या सामन्यात रचिनने फलंदाजी आणि गोलंदाजीमधून संघाच्या विजयामध्ये योगदान दिलं. या सामन्यासाठी बंगळुरुमध्ये आल्यानंतर रचिन रविंद्र त्याच्या वडिलांच्या मूळ घरीही जाऊन आला. त्यावेळेस त्याच्या आजीचे त्याची दृष्ट काढली. त्याच्या आजीने त्याची नजर काढल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
खरं तर भारतीय वंशाच्या खेळाडूंनी न्यूझीलंडकडून खेळणं काही नवीन नाही. ईश सोढी, जीतन पटेल, जीत रावल यासारखे भारतीय वंशाचे खेळाडू न्यूझीलंडकडून खेळले आहेत. या यादीमधील सर्वात लेटेस्ट नाव म्हणजे रचिन रवींद्र! न्यूझीलंडच्या वर्ल्ड कप 2023 मधील दमदार कामगिरीमध्ये या भारतीय वंशाच्या क्रिकेटपटूचं मोलाचं योगदान राहिलं आहे. या खेळाडूने पदार्पणाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक कमी वयात म्हणजेच 25 वर्षांहून कमी वय असताना सर्वाधिक धावा करण्याचा सचिन तेंडुलकरचा विक्रम बंगळुरुमधील मैदानामध्ये आपल्या नावे केला.
रचिनचा जन्म वेलिंग्टनमध्ये भारतीय वंशाचे रवि कृष्णमूर्ती आणि दीपा कृष्णमूर्ती यांच्या पोटी झाला. रवि हे एक सॉफ्टवेअर सिस्टीम आर्किटेक्ट आहेत. रवि हे मुळचे बंगळुरुचे असल्याने आपल्या वडिलांच्या मूळ शहरामध्ये खेळल्याचा आणि त्याच सामन्यात आपल्या नावावर विक्रम झाल्याचं समाधान आहे असं रचिनने श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर म्हटलं आहे. "माझ्या दूरच्या नातेवाईकांसमोर बंगळुरुमध्ये खेळणं फारच स्पेशल होतं. इथं माझ्या नावाचा जयघोष केला जात होता हे फारच रोंमांचक होतं," असं रचिनने म्हटलं आहे.
रचिन रविंद्रने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यामध्ये 42 धावांची खेळी केली. या खेळीसहीत त्याचा नावावर यंदाच्या वर्ल्ड कपमधील आणखी एका विक्रमाची नोंद झाली. आपल्या पहिल्याच वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये रचिनने सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडला आहे. रचिनच्या नावावर सध्या 565 धावा आहेत. इंग्लंडच्या जॉनी ब्रेस्टोचा 532 धावांचा पदार्पणातच सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडला आहे. रचिनच्या खेळीची आणि विक्रमाची चर्चा असतानाच त्याच्या आजीने त्याची नजर काढतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये रचिन एका सोफा चेअरवर बसला असून त्याची आजी त्याची नजर काढताना दिसतेय. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आजीचं प्रेम हे असेच असते असं म्हटलं आहे.
Newzeland cricket player Rachin Ravindra at his grandparents home in Bengaluru. pic.twitter.com/bcGoVGHeRQ
— MTN KUMAR … (@pourvanikumar) November 10, 2023
रचिनचे वडील रवि 1990 च्या दशकामध्ये बंगळुरुमधून न्यूझीलंडला स्थायिक झाले. ते तेथील हट हॉक्स क्लबचे संस्थापक आहेत. रवि हे क्रिकेटचे मोठे चाहते आहेत. ते बंगळुरुमध्ये फार वर्ष क्रिकेट खेळले. रचिन रविंद्रचं नाव ऐकून तो भारतीय असल्याचं समजतं. पण रचिन हे नाव का ठेवण्यात आलं. तर यामागे कारण आहे भारताचे माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड! राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) नावातील पहिलं अक्षर रा (Ra) आणि सचिन तेंडुलकरच्या नावातील 'चिन' (Chin) नाव एकत्र करुन रचिन (Rachin) हे नाव ठेवण्यात आलं आहे. रचिनने नोव्हेंबर 2016 मध्ये एका मुलाखतीत, "भारताचा दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर माझा आदर्श आहे. त्याच्याप्रमाणे फलंदाजीची शैली शिकण्याचा मी प्रयत्न केला आहे. सचिनची फलंदाजी मी लहान असल्यापासून पाहिली आहे," असं म्हणाला होता.