मुंबई : भारताने नुकतेच ११८ चिनी ऍप्स आणि गेम्सवर बंदी घातली. तरुणाईला या ऍप्ससाठी पर्याय हवा होता. तरुणाईची हीच निकड लक्षात घेऊन निखिल मालनकर यांच्या गेम-ई-ऑन या गेमिंग कंपनीने एक नवा गेम बाजारात आणला आहे. स्पेशल युनिट बॅटल ग्राऊंड अर्थात ‘सब्जी’ (SUBG) असे या गेमचे नाव आहे. नुकतेच या गेमचे अनावरण करण्यात आले.
आभासी जगातील अत्याधुनिक बंदुकासह रणांगणावर मित्रांसोबत आभासी लढाई लढण्याची मजा सब्जी (SUBG) मध्ये आहे. हा गेम ८ खेळाडूंसोबत खेळण्याची सुविधा आहे. तीन पद्धतीने यामध्ये खेळता येते. फ्रि फॉर ऑल, टीम डेथमॅच आणि कॅप्चर दी फ्लॅग अशा या तीन पद्धती आहेत. खेळ रोमहर्षक व्हावा यासाठी एका बंद पडलेल्या कारखान्याचा नकाशा यामध्ये समाविष्ट आहे. अनेक खेळाडूंसोबत सानुकूलित नेमबाजीचा हा खेळ मित्रांसोबत कधीही खेळता येऊ शकतो हे या गेमचे वैशिष्ट्य आहे. प्ले स्टोअर वर हा गेम विनामूल्य उपलब्ध आहे.
“भारताने चिनी ऍप्स आणि गेम्सवर बंदी घातली. चिनी तंत्रज्ञ एवढे ऍप्स व गेम्स बनवू शकतात मग आपले तंत्रज्ञ काय करतात अशा आशयाचे आपल्या तंत्रज्ञांची खिल्ली उडविणारे मेसेज समाजमाध्यमांवर व्हायरल झाले होते. आपण भारतीय तंत्रज्ञ तंत्रज्ञानात कुठेही मागे नाहीत. स्पेशल युनिट बॅटल ग्राऊंड अर्थात ‘सब्जी’ हा गेम याचं उत्तम उदाहरण आहे.
संपूर्णत: भारतीय संस्कार असलेला हा गेम आपल्या तरुणाईसाठी चिनी गेम्सकरिता निश्चितच एक चांगला पर्याय देईल. हा गेम भारतीय तरुणांच्या पसंतीस निश्चित उतरेल,” असा आशावाद हा गेम तयार करणाऱ्या गेम-ई-ऑनचे संचालक निखिल मालनकर यांनी व्यक्त केला.