apple iphone : भारतामध्ये मागील काही वर्षांत आयफोन वापरणाऱ्यांचा आकडा मोठ्या फरकानं वाढला आहे. अॅपलकडून मिळणारी सुरक्षिततेची हमी आणि तत्सम अनेक कारणांसाठी आयफोनला अनेकांचीच पसंती असते. पण, आता मात्र याच आयफोन वापणाऱ्यांवर एक सावट घोंगावताना दिसत असून, अॅपल भारतासह 91 देशांमधील आयफोन युजर्सना तातडीनं एक सावधगिरीचा इशारा देणार आहे. तुम्हीही आयफोन वापरत आहात का? ही बातमी तुमच्यासाठी.
अॅपलकडून ज्या आयफोन (iPhone ) धारकांना "मेर्सनरी स्पायवेयर" (Mercenary Spyware) चा अर्थात हेरगिरी करणाऱ्या सॉफ्टवेअरचा धोका आहे त्यांना अॅपलच्या वतीनं एक सतर्क करणारं नोटिफिकेशन पाठवण्यात येणार आहे. सर्वसाधारण सायबर अटॅक पेक्षा या सॉफ्टवेअरचा धोका वेगळा आणि अधिक गंभीर असून, युजरच्या फोनमधील माहिती कोणत्याही परवानगीशिवाय चोरण्यासाठी या सॉफ्टवेअरचा वापर करण्यात येत आहे. (Apple Mercenary Spyware Warning)
तुमचा मोबाईल स्पायवेअरच्या विळख्यात आल्यास तुम्हाला Apple कडून दोन पद्धतींनी मेसेज पाठवण्यात येतो. यामध्ये फोनला अशा हल्ल्यापासून सुरक्षित कसं ठेवायचं यासाठीसुद्धा Appleकडून मदत देकी जाते. इथं प्राधान्य असतं ते म्हणजे Lockdown Mode सुरु करणं. appleid.apple.com वर लॉगईन करताच युजर्सना Threat Notification दिसेल. अॅपलकडून तुमचा Apple ID, ईमेल, दूरध्वनी क्रमांक आणि iMessage वर याबाबतचं नोटिफिकेशन पाठवेल.
तुमचा फोन या हल्ल्याचा शिकार झाल्यास सर्वप्रथम Digital Security Helpline शी संपर्क साधावा. जिथं तुम्हाला फोन सुरक्षित ठेवण्यासाठी दिवसातील 24 तास मदत केली जाईल.
अॅपल युजर्समध्ये सध्या मेर्सनरी स्पायवेयर हा एक शब्द बराच चर्चेत असल्याचं पाहायला मिळत आहे. मेर्सनरी स्पायवेयर हे सॉफ्टवेअर इतर सायबर हल्ल्य़ांपेक्षा वेगळं आहे. इथं हॅकर अतिशय शिताफीनं काही निवडक युजर्सना निशाण्यावर घेतात. अशा पद्धतीच्या सायबर हल्ल्यांसाठी कैक कोटींचा खर्चही केला जातो ज्यानंतर हे सॉफ्टवेअर तातडीनं निकामीसुद्धा करण्यात येतात. ज्यामुळं अशा हॅकर्सना पकडणंही कठीण होऊन जातं.
Apple च्या माहितीनुसार हॅकर्सकडून या सॉफ्टवेअरचा वापर करत सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेतेमंडळी, मोठ्या हुद्द्यांवर सेवेत असणारे अधिकारी आणि पत्रकारांना सहसा निशाण्यावर घेतलं जातं. 201 पासून Apple कडून साधारण 150 देशांतील युजर्सना सायबर हल्ल्यासंदर्भात सतर्क करण्यात आलं आहे.