नवी दिल्ली : आपल्या रोजच्या जीवनात, कामाच्या ठिकाणी सर्रास वापरण्यात येणारा कॉम्प्युटर अतिशय महत्त्वाची बाब आहे. विचार करा कॉम्प्युटरमध्ये कट, कॉपी, पेस्ट या शॉर्टकट सुविधा नसत्या तर? Ctrl+C, Ctrl+V आणि Ctrl+X या तीन शॉर्टकटमुळे मोठी कामंही आज अगदी सहजपणे पूर्ण करता येत आहेत. कॉम्प्युटरमधल्या या सुविधेचे जनक, कॉम्प्युटर संशोधक लॅरी टेस्लर larry-tesker आहेत. कॉम्प्युटर संशोधक लॅरी टेस्लर यांचं वयाच्या ७४व्या वर्षी निधन झालं आहे.
लॅरी टेस्लर यांनी १९६०च्या दशकात, अशावेळी कॉम्प्युटर जगतात काम सुरु केलं, ज्यावेळी कॉम्प्युटरबाबत लोकांना अधिक माहिती नव्हती. त्यांनी आपल्या कारकिर्दीतील बहुतांश भाग Xerox कंपनीमध्ये घालवला.
कंपनीने त्यांना श्रद्धांजली देत, कट, कॉपी, पेस्ट, फाइंड आणि रिप्लेसमेंटचे जनक आणि Xeroxचे माजी संशोधक लॅरी टेस्लर यांचं निधन झाल्याचं सांगितलं. त्यासोबतच कंपनीने, त्यांच्या क्रांतीकारी विचारांमुळे कामं अधिक सोपी झाल्याचंही म्हटलंय.
लॅरी टेस्लर यांचा जन्म १९४५ मध्ये न्यूयॉर्कच्या ब्रांक्समध्ये झाला होता. त्यांनी कॅलिफोर्नियातील स्टेनफोर्ड यूनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेतलं. १९७३ मध्ये ते Xerox मध्ये भरती झाले. तिथेच त्यांनी टिम मॉटसह मिळून, जिप्सी टेक्स्ट एडिटर तयार केला. त्यातच त्यांनी कंटेंट कॉपी आणि एका जागेवरुन दुसऱ्या जागी मूव्ह करण्यासाठी मोडलेस पद्धत तयार केली. त्यातूनच कट, कॉपी आणि पेस्टची संकल्पना आली.
Xerox Palo Alto Research Centerशी (PARC) अनेक वर्ष जोडल्यानंतर स्टीव जॉब्स, त्यांना Apple मध्ये घेऊन आले. तेथे त्यांनी १७ वर्ष काम केलं. Apple सोडल्यानंतर त्यांनी एक एज्युकेशन स्टार्ट अप सुरु केलं. यादरम्यान ते काही काळ अमेझॉन आणि याहूसोबतही जोडले गेले होते.