Facebook Private Messages Leak : इंटरनेटचा शोध लागल्या क्षणापासून संपूर्ण जगाला जणू एक वेगळी दिशा मिळाली. किंबगुना तंत्रज्ञानाच्या क्रांतीला खऱ्या अर्थानं वेग आला. पुढं सोशल मीडियाची विविध माध्यमं विविध रुपात आणि तितक्याच विविध कारणांनी नेटकऱ्यांच्या वापरात आणि त्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग झाली. त्यातलंच एक माध्यम म्हणजे फेसबुक. अगदी मोफत सोशल नेटवर्किंगचा अनुभव घेऊ देणाऱ्या या फेसबुकचा वापर जगातील असंख्य युजर्स करतात. पण, हेच फेसबुक तुमची गोपनीय माहिती, तुमचे खासगीतले संदेश अर्थात मेसेज एता त्रयस्त कंपनीला वाचण्याची मुभा देतंय हे तुम्हाला माहितीये का?
मार्क झुकरबर्गच्या फेसबुकवर नुकताच नेटफ्लिक्सला डेटा देण्याच्या मोबदल्यात युजर्सच्या खासगी मेसेज बॉक्समध्य़े अॅक्सेस करण्याची परवानगी देण्याचा गंभीर आरोप लावण्यात आला आहे. काही न्यायालयीन कागदपत्रांमुळं यासंदर्भातील माहिती समोर आली. Gizmodo च्या माहितीनुसार मेटानं स्ट्रीमिंग बिझनेसला टाळं ठोकण्याचा निर्णय घेतला त्याच क्षणी हे पितळ उघडं पडलं.
उत्पन्नातील घट आणि कर्मचारी कपातीचं कारण देत मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात मेटानं स्ट्रीमिंग व्यवसाय बंद करण्याचा निर्णय समोर आला होता. दरम्यान, नव्यानं उघडकीस आलेल्या कागदपत्रांनुसार फेसबुक आणि नेटफ्लिक्स या दोन्ही कंपन्यांमध्ये हा करार 2013 मध्ये झाला होता, त्याआधीच मेटानं फेसबुक मॅसेंजरमधील चॅट एंड टू एंड एन्क्रीप्टेड असल्याचंही म्हटलं होतं. Netflix नं फेसबुकवरील जाहिरातींसाठी 150 मिलियन डॉलर इतकी रक्कम मोजली असून, हे सत्र 2019 पासून सुरु आहे.
फेसबुकवर जाहिरातींसाठी सर्वाधिक खर्च करणारं नेटफ्लिक्स एक आघाडीचं माध्यम आहे. हादरवणारी बाब अशी की, 2013 मध्ये झालेल्या करारामुळं कथित स्वरुपात नेटफ्लिक्सला फेसबुकनं युजर्सच्या खासगी संदेशांमध्ये डोकावण्याची परवानगी दिली होती. या अॅक्सेसच्या मोबदल्यात नेटफ्लिक्सनं फेसबुकला काही महत्त्वाच्या परवानग्यांसमवेत युजर इंटरॅक्शनसंदर्भातील महत्त्वाची माहितीसुद्धा दिली होती.
दरम्यान, युजर्सच्या खासगी मेसेजेसमध्ये डोकावण्याची परवानगी देण्याचा आरोप असणाऱ्या मेटाकडून नेटफ्लिक्ससोबतचा हा करार म्हणजे स्टँडर्ड इंडस्ट्री प्रॅक्टीसचाच एक भाग अस्ल्याचं सांगण्यात आलं. इथं फेसबुक वॉच बंद करण्यासाठी नेटफ्लिक्सकडूनच दबाव असल्याची बाब मात्र मेटाकडून सांगण्यात आलेली नाही.