Devendra Fadnavis on Uddhav-Raj: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात कोणते ठाकरे आहेत.. उद्धव ठाकरे की राज ठाकरे?.. याची राज्यभरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. याचं कारण नागपुरात झालेल्या एका मुलाखतीत फडणवीसांना विचारलेला एक प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीस यांना राज ठाकरे की उद्धव ठाकरे असा प्रश्न विचारला गेला.. त्यावर फडणवीसांनी काय उत्तर दिलं जाणून घ्या.
राज ठाकरे की उद्धव ठाकरे असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. “राजकारणात काहीही पक्क नसतं. आधी उद्धव ठाकरे मित्र होते. मग राज ठाकरे मित्र झाले. आता राज ठाकरे मित्र आहेत आणि उद्धव ठाकरे शत्रू नाहीत," असं सूचक विधान मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. फडणवीसांच्या या वक्तव्याचा संबंध मागील काही दिवसांतल्या ठाकरे-आणि फडणवीस यांच्या भेटीगाठींशीही जोडला जातोय..
मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर राजकारणात काहीही होऊ शकतं अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. तर समविचारी पक्ष सोबत येणार असतील तर पक्षनेतृत्व त्याचा नक्कीच विचार करेल अशी प्रतिक्रीया भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. दरम्यान भाजप आणि मनसे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कधीही एकत्र येऊ शकतात अशी भूमिका मनसेने मांडली आहे. यावेळी मनसेने उद्धव ठाकरेंनाही टोला लगावला आहे.
राजकारणात कोण कुणाचा कायमचा मित्र नसतो आणि कोण कुणाचा कायमचा शत्रू नसतो.. 2019 पासून महाराष्ट्राच्या राजकारणातील घडामोडी पाहिल्या तर यावर नक्कीच विश्वास बसेल.