चोर स्वत: परत आणून देईल चोरी केलेला मोबाइल, IPS अधिकाऱ्याने सांगितली अगदी सोपी पद्धत; पाहा VIDEO

Easy Way to find theft mobile: आयपीएस (IPS) अधिकाऱ्याने 45 सेकंदाचा व्हिडीओ (Video) शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी कशाप्रकारे आपण अत्यंत सहजपणे हरवलेला मोबाइल (Mobile) मिळवू शकतो हे सांगितलं आहे. IPS अधिकारी अशोक कुमार (Ashok Kumar) यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Jun 8, 2023, 02:07 PM IST
चोर स्वत: परत आणून देईल चोरी केलेला मोबाइल, IPS अधिकाऱ्याने सांगितली अगदी सोपी पद्धत; पाहा VIDEO title=

Easy Way to find theft Mobile: आपला मोबाइल (Ashok Kumar) म्हणजे प्रत्येकासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो. फोन क्रमांक याशिवाय मोबाइलमध्ये फोटो, व्हिडीओ तसंच इतरही अनेक महत्त्वाच्या गोष्टी असतात. त्यामुळेच जेव्हा मोबाइल हरवतो तेव्हा आपण हैराण होतो. आपल्या मोबाइलमधील डेटा लीक होण्यापासून ते त्याचा गैरवापर होण्यापर्यंत अशा अनेक गोष्टी आपल्या मनात येत असतात. त्यामुळेच आपला मोबाइल काही करुन मिळावा यासाठी आपण धावपळ करतो. काही लोक पोलिसांत तक्रार केल्यानंतर आपल्याला मोबाइल मिळेल या आशेने वाट पाहत असतात. तर काहीजण मोबाइल परत मिळेल याची आशाच सोडून देतात. पण मोबाइल हरवला असेल तर घाबरण्याची गरज नाही. नुकतंच एका आयपीएस अधिकाऱ्याने मोबाइल हरवल्यास काय करावं हे सांगणारा व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला आहे. ही पद्धत अवलंबली तर चोरही हतबल होऊन मोबाइल तुम्हाला परत आणून देतील. 

45 सेकंदाच्या व्हिडीओत आयपीएस अधिकारी अशोक कुमार यांना कशाप्रकारे आपण चोरी झालेला मोबाइल परत मिळवू शकतो हे सांगितलं आहे. व्हिडीओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की "माझा मोबाइल चोरी झाला आहे. सर्वात आधी चिंता करु नका. जर तुमच्याकडे वेळ नसेल आणि पोलिसांकडे जाऊ शकत नसाल तर ही माहिती तुमच्या कामी येईल. चोरीची तक्रार करण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि आपली तक्रार दाखल करा. यामुळे चोर तुमचा मोबाइल वापरु शकणार नाही आणि परत करण्यास हतबल होईल". या व्हिडीओला 7 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर 10 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. 

व्हिडीओत चोरी झालेला फोन कशाप्रकारे ब्लॉक करु शकतो याची माहिती देण्यात आली आहे. याआधी सर्वात आधी मोबाइलचं बिल आणि एफआयआर कॉपीसह मोबाइलचा IMEI नंबर एकत्रित करा. नंतर https://ceir.gov.in/Request/CeirUserBlockRequestDirect.jsp या वेबसाइटवर जाऊन चोरी किंवा हरवलेला मोबाइल ब्लॉक करण्यासंबंधीचा पर्याय निवडायचा आहे. यानंतर एक फॉर्म येईल. या फॉर्ममध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरायची आहे. 

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकजण कमेंट करत आहेत. हा व्हिडीओ फार फायद्याचा असल्याचं काहीजण सांगत आहेत. मात्र काहीजण संतापही व्यक्त करत आहे. तक्रार केल्यानंतरही काही होत नाही असं सांगत ते म्हणत आहेत. 

अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट केली आहे. एका युजरने लिहिलं आहे की, "माहिती चांगली आहे, पण सामान्य माणसाचा मोबाइल कधीच परत मिळत नाही". तर अन्य एकाने लिहिलं आहे की "मी 3 तारखेला तक्रार दाखल केली असून तक्रार दाखल होताच 24 तासात मोबाइल ब्लॉक करण्यात येईल असं सांगण्यात आलं. आज 7 तारीख आहे आणि अजूनही ब्लॉक केलेलं नाही. Expected for Blocking असा मेसेज येत आहे. जर डेडलाइन पाळता येत नसताना किंवा पूर्ण करता येत नसेल तर का दिली जाते".