मुंबई : स्पर्धेच्या युगात मोबाईल क्षेत्रात अनेक कंपन्या आहेत. प्रत्येक कंपनीकडून आपल्या ग्राहकाला चांगली सेवा देण्याचा प्रयत्न असतो. ग्राहकांना आपल्याकडे ओढण्यासाठी कंपन्यांकडून नवनव्या ऑफर देण्यात येतात. पण काहीवेळा मोबाईल कंपनी बंद होत असल्यामुळे किंवा कंपनीकडून चांगली सेवा न दिल्याने ग्राहक आपला नंबर दुसऱ्या कंपनीत पोर्ट करतात. पोर्ट करताना ग्राहकाला किमान आठवडाभर वाट पाहावी लागते. यामुळे ग्राहकाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आता नंबर पोर्टिग करण्याची प्रक्रिया सोप्पी आणि जलद झाली आहे. भारतीय दूरसंचार नियामक आयोगाने (trai) या नियमात बदल केले आहेत. आता मोबाईल नंबर पोर्ट करण्यासाठी केवळ दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे. दोन दिवसांत मोबाईल नंबर पोर्ट होणार आहे.
एका सर्कलमधील मोबाईल नंबर पोर्ट करायचा असल्यास दोन दिवसांत ही प्रकिया पूर्ण होणार. दोन वेगळ्या सर्कलमधील मोबाईल नंबर पोर्ट करायचे असतील तर यासाठी चार दिवसांचा वेळ लागणार असल्याची माहिती 'ट्रायने' दिली. 'ग्राहकांना चांगली सेवा देण्याकडे आमचे लक्ष आहे, यासाठीच आम्ही असे निर्णय घेत आहोत', असे ट्रायने सांगितले.
मोबाईल नंबर पोर्ट करण्यासाठी कंपनीकडून दिरंगाई होत असेल तर, कंपनीला १० हजारांचा दंड द्यावा लागेल. एका सर्कलदरम्यान नंबर पोर्ट करण्यासाठी कमाल ४८ तासांची मर्यादा आहे. तर कॉर्पोरेट कनेक्शनसाठी ही मर्यादा ४ दिवसांची आहे. तसेच युनिक पोर्टिंग कोडची वैधता ही आधी १५ दिवसांची होती. आता ही मर्यादा कमी करुन ४ दिवस करण्यात आली आहे. हा नियम जम्मू-काश्मीर, आसाम आणि उत्तरेतील राज्यांसाठी लागू नसेल. या राज्यासांठी युनिक पोर्टिंग कोडची वैधता ३० दिवसांची आहे. ग्राहकाने पोर्टिंगसाठी पाठवलेली विनंतीदेखील रद्द करण्यासंदर्भातील नियम शिथिल करण्यात आले आहेत. एक टेक्स्ट मेसेजद्वारे पोर्टिंग विंनती रद्द करता येईल. कॉर्पोरेट कनेक्शन असलेल्या ग्राहकांना एका पत्राद्वारे ५० ऐवजी १०० विनंत्या रद्द करता येतील.
ग्राहकाला मोबाईल नंबर पोर्ट करण्यासाठी, एक युपीसी कोड (युनिक पोर्टिंग कोड) तयार करावा लागतो. यासाठी आपल्या मोबाईल वरुन PORT टाईप केल्यावर एक स्पेस देऊन १९०० या नंबरवर मेसेज पाठवायचा आहे. यानंतर ग्राहकाला यूपीसी कोड पाठवला जातो. हा कोड सर्व्हिस प्रोव्हायडर बदलताना द्यावा लागेल. सोबतच ग्राहकाला आधार नंबर द्यावा लागेल. तसेच एक फॉर्म भरावा लागणार आहे. याआधी जर ग्राहक पोस्टपेड असेल तर जुने बिल नजीकच्या कार्यालयात जमा करावे लागते.
दुसऱ्या मोबाईल नेटवर्क मध्ये नंबर पोर्ट करण्यासाठी ४ रुपये द्यावे लागतील. आधी हे दर १९ रुपये होते. नव्या नेटवर्कमध्ये प्रवेश होण्याआधी जुने सीमकार्ड मधील नेटवर्क निघून जाणार. यानंतर ग्राहकाला जुने सीमकार्ड काढून नवे सीमकार्ड टाकावे लागणार आहे. नवे सीम टाकल्यानंतर काही तासाने नेटवर्क येईल.