5G in India : भारतात 5G सेवा सुरु होणार याची बऱ्याच काळापासून चर्चा होती मात्र कधी सुरु होणार याची सर्वच युझर्स प्रतीक्षा करत होते. अखेर तो दिवस उजाडलाच असून देशाच्या 76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मोठी घोषणा केली आहे. भारतात लवकरच 5G सेवा (5G) सुरू होईल. लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आता आपल्याला 5G सेवेसाठी अधिक प्रतीक्षा करावी लागणार नाही. लवकरच लोकांना 5G सेवा मिळणे सुरू होईल. आम्ही देशातील प्रत्येक गावाला ऑप्टिकल फायबर पुरवत आहोत. देशाचे डिजिटल इंडिया मिशन पूर्ण करण्यात गावाची मोठी भूमिका असेल हे आम्हाला माहीत आहे.
आपल्या भाषणात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5G तंत्रज्ञानाशी संबंधित सर्वांगीण विकासाबद्दल सांगितले. ज्यामध्ये 5G सेवेसाठी इलेक्ट्रॉनिक चिप्स, ऑप्टिकल फायबर केबल्सचे नेटवर्क (OFC), खेडोपाडी डिजिटल उद्योजकतेपर्यंत पोहोचणारे नेटवर्क यांचा समावेश आहे. यावेळी, मला आनंद आहे की, भारतातील खेड्यापाड्यात 4 लाख कॉमन सर्व्हिस सेंटर्स विकसित करण्यात आली आहेत. देशात खेड्यातून ४ लाख डिजिटल उद्योजक निर्माण झाले आहेत. खेड्यापाड्यातील लोकांना या सामायिक सेवा केंद्रातून सेवा घेण्याची सवय लागली आहे असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
4G पेक्षा 10 पट वेगवान इंटरनेट
वापरकर्ते देखील 5G सेवेबद्दल उत्सुक आहेत. कारण सध्याच्या 4G पेक्षा 10 पट वेगवान इंटरनेट स्पीड मिळेल. 5G सेवा सुरू झाल्यानंतर, वापरकर्त्यांना 100Mbps ते 1Gbps पर्यंत इंटरनेट स्पीड मिळेल. 10 मिनिटांत डाउनलोड केलेली फाइल काही सेकंदात डाउनलोड करता येते. एअरटेल आणि रिलायन्स जिओने लवकरच 5G लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. एअरटेल या महिन्यापासून म्हणजेच ऑगस्टपासून 5G सेवा तैनात करण्यास सुरुवात करेल. कंपनीने घोषणा केली आहे की पुढील वर्षी मार्चपर्यंत देशभरात Airtel 5G सेवा सुरू होईल.
5G सेवा देणार या सुविधा
5G सेवा सुरू केल्यामुळे, ग्राहकांना कोणत्याही डिस्टर्ब्न्सशिवाय सुपरफास्ट इंटरनेट स्पीड पाहण्यास मिळेल, जो पूर्वीपेक्षा अधिक चांगला अनुभव देईल त्यामुळे शिक्षण, कृषी, आरोग्य या क्षेत्रांना मोठा फायदा होणार आहे.