मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांच्या कारच्या नंबर प्लेटचा (Ratan Tata's Car Number) वापर दुसराच कोणीतरी करत होता. मात्र, याची माहिती टाटा यांना नव्हती. ज्यावेळी वाहतूक नियम मोडल्याप्रकरणी टाटा यांना वाहतूक पोलीस (Traffic police) शाखेकडून ई चलन ( e challan) पाठविण्यात आले. त्यावेळी टाटा यांनाही आश्चर्य वाटले. नियम न मोडता ई चलन आले कसे, याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी त्यांनी वाहतूक शाखेकडे तक्रार केली. त्यावेळी धक्कादायक माहिती पुढे आली. रतन टाटा यांच्या गाडीचा नंबर एक महिला आपल्या कारवर लावून चालवत होती.
सिग्नल तोडल्यामुळे रतन टाटा यांच्याकडे ई चलन पोहोचल्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली. त्यावेळी मुंबईत एक महिला रतन टाटा यांच्या गाडीची नंबर प्लेट वापरून कार चालवत होती. ही कार समोर आल्यानंतर ही बाब समोर आली. या महिलेच्या विरोधात कलम 420 आणि 465नुसार तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, आपल्याला एका ज्योतिषीने विशेष नंबरची प्लेट वापरण्याचा सल्लाल दिला. या ज्योतिषाच्या सांगण्यावरून महिलेने रतन टाटा यांच्या गाडीचा नंबर वापरला, अशी माहिती आता पुढे आली आहे.
वाहतुकीचे नियम मोडल्यानंतर इ चलन येत होते. याबाबत तक्रार येताच वाहतूक पोलिसांनी तपासणी केली असता टाटांच्या गाडीचा नंबर वापरून दुसराच कुणी तरी नियम मोडत असल्याचे समोर आले. हा प्रकार उघड होताच वाहचालकावर माटुंगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच वाहतूक पोलिसांनी इ चलनाच्या थकीत दंडाची रक्कमही वसूल केली.
मुंबईत एक वाहनचालक बनावट नंबर प्लेट वापरत असल्याची तक्रार मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेकडे आली. नंबरवरून ही गाडी रतन टाटा यांच्या मालकीची असल्याचे समोर आले. टाटांच्या गाडीच्या क्रमांकाचा गैरवापर केला जात असल्याचे लक्षात येताच गाडीचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी अशा नंबरची कार एक महिला चालवत असल्याचे पुढे आले.