मुंबई : पॉवरफूल बाईक बनवणारी रॉयल एनफील्ड १२ जानेवारीला भारतात बाईकचं नवीन मॉडेल लॉन्च करणार आहे. रॉयल एनफील्ड हिमालयन Fi बाईकचं हे २०१८ मॉडेल असेल. या बाईकचे फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहेत.
या बाईकचं अपडेटेड व्हर्जन पेंट स्कीम सोबत येणार आहे. हिमालयन Fi ही रॉयल एनफील्डची पहिली ऑफ रोड बाईक आहे. रॉयल एनफील्डशिवाय कोणतीही दुसरी कंपनी भारतीय बाजारात या किंमतीला ऑफ रोड बाईक विकत नाही.
हिमालयन Fi या मॉडेलच्या इंजिनामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या बाईकमध्ये आधीचच ४११ सीसी इंजिन असेल. हे इंजिन २४.५ बीएचपी पॉवर आणि ३२ एनएम टॉर्क जनरेट करेल.
बाईकच्या फ्रंट व्हीलमध्ये ३०० एमएम डिस्क ब्रेक आणि रियर व्हीलमध्ये २४० एमएम डिस्क ब्रेक असणार आहे. हिमालयन Fi बाईकचं फ्रंट व्हील २१ इंच असेल. तसंच लांब विंडस्क्रीन, जास्त माहिती असणारा इंस्ट्रूमेंट क्लस्टर देण्यात आलं आहे.
रॉयल एनफील्ड हिमालयन Fi बाईकमध्ये एबीएस म्हणजेच अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम देऊ शकते. या बाईकची किंमत २,१२,६६६ असेल. रॉयल एनफिल्डची ही बाईक लिमिटेड एडिशनमध्येच येणार आहे. या बाईकचे फक्त ५०० मॉडेल्सच बनवण्यात येणार आहेत. ऑनलाईन बूकिंग करूनच ही बाईक विकत घेता येईल.
या नव्या मॉडेलसाठी ग्राहकांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. १२ जानेवारी ते ३० जानेवारीदरम्यान या बाईकसाठी रजिस्ट्रेशन करावं लागेल. ३० जानेवारीला बाईकची विक्री ऑनलाईन होईल आणि पहिले आलेल्यालाच प्राधान्य देण्यात येईल.