नागपूर : १८ ते २५ वयोगटातील तरुण तरुणींसाठी ९० मिनिटांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. परीक्षा हिंदी व इंग्रजीसह सर्व प्रादेशिक भाषेत होईल. त्यासाठी खुल्या वर्गातील परीक्षार्थींसह ओबीसी परीक्षार्थींकडून ५०० तर इतर वर्गासाठी २५० रुपयांचे परीक्षा शुल्कासह अर्ज मागविण्यात आल्याची एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.
ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्यांची शारीरिक चाचणी आणि त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी असे दोन टप्पे पार करावे लागेल असे ही त्या जाहिरातीत नमूद करण्यात आले होते. उत्तर भारतातील काही वेब पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या या जाहिरातीला राज्यातील शेकडो तरुण बळी पडले होते.
रेल्वे सुरक्षा दलात तब्ब्ल ९०० पदांसाठी भरती हॊणार असल्याबद्दल ही जाहिरात प्रसिद्ध झाली होती. यानंतर काहींनी रेल्वे अधिकाऱ्यांना संपर्क साधून तयारीबद्दल टिप्स मागितल्या होत्या. मात्र, रेल्वे अधिकाऱयांनी केलेल्या अधिक चौकशीअंती अशी कोणतीही जाहिरात रेल्वेने प्रसिद्ध केली नसल्याचं समोर आलंय.
या जाहिरातीवर विश्वास ठेऊन शेकडो तरुणांनी परीक्षा शुल्क जमा केले होते. यानंतर भरती प्रक्रियेची वाट पाहत होते. या तरुणांनी रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधला तेव्हा त्याना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं.
यांनतर रेल्वे सुरक्षा दलाचे नागपूर मंडळचे विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांनी रेल्वे सुरक्षा दलातर्फे अशी कोणतीही जाहिरात देण्यात आली नाही. काही वेब पोर्टलवर झळकलेली ती जाहिरात फसवी आहे. कोणी तरी तरुणांची फसवणूक करत असून यापुढे कुणीही या जाहिरातीला बळी पडून अर्ज करू नये असं आवाहन केलंय.