अमरावती: दूध दरवाढीच्या मुद्द्यावरून मुंबईचा दूध पुरवठा तोडण्याचा इशारा दिलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते रविवारी आक्रमक झाले. त्यामुळे या आंदोलनाची सुरुवातच हिंसक घटनेने झाली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अमरावतीमध्ये दुधाचा टँकर अडवून त्याची तोडफोड केली. त्यानंतर चालकाला खाली उतरवून हा टँकर पेटवूनही दिला. त्यामुळे दुधाच्या टँकर्सना संरक्षण देऊ, असे आश्वासन देणाऱ्या दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांची कोंडी होण्याची शक्यता आहे.
यापूर्वी स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषद घेऊन तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. दूध उत्पादकांना योग्य भाव मिळत नाही. याची प्रशासनाला जाणीव व्हावी, यासाठी मुंबईचा दूध पुरवठा तोडण्याचा इशारा शेट्टी यांनी दिला होता. शेट्टींनी पंढरपुरातून आंदोलन सुरु करणार असल्याचे सांगितले होते. रविवारी मध्यरात्री श्री विठ्ठलाच्या मुर्तीस दुग्धाभिषेक करून या आंदोलनाची सुरूवात होईल.
तत्पूर्वी शनिवारी सरकारकडून शेतकऱ्यांच्या दुधाला प्रती लिटर तीन रुपयांची दरवाढ देण्याची घोषणा करण्यात आली होती. राज्यभरातील सहकारी आणि खासगी दूध उत्पादक संघांच्या महत्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जीएसटी कमी झाल्यास दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला आणखी एक रुपया वाढवून देण्याचाही निर्णय या बैठकीत झाला. मात्र, राजू शेट्टींनी हा प्रस्ताव फेटाळत आंदोलनावर ठाम असल्याचे सांगितले होते. अतिरिक्त उत्पादन झालेली दुधाची पावडर आणि बटरबाबत निर्णय घ्यावा. राज्य सरकारने या दूध बाजारात हस्तक्षेप करावा. अतिरिक्त झालेलं दूध महानंद तर्फे २७ रूपये प्रीलिटरने खरेदी करावे, या मागण्या शेट्टींनी लावून धरल्या आहेत.