नवी दिल्ली : अमेरिकेनेने पाकिस्तानला पुरवलेल्या एफ १६ विमानांचा भारताविरोधात वापर का केला याचा जाब अमेरिका पाकिस्तानला विचारणार आहे. दहशतवादाविरोधातल्या लढ्यासाठी ही अत्याधुनिक विमानं अमेरिकेने पाकिस्तानला पुरवली होती. मात्र ही विमानं भारतावर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानने वापरल्याने अमेरिकन सरकारमध्ये संताप आहे. भारताने एफ १६ च्या वापराचे पुरावेच सादर केले होते. पाकिस्तानने मात्र एफ १६ वापरल्याचा इन्कार केलाय. पण भारताने एफ १६ च्या वापराचे पुरावेच भर पत्रकार परिषदेत सादर केले. एवढंच नाही तर भारताकडे रडार फुटप्रिंट असल्याचंही जाहीर केलं.
भारत सरकारतर्फे पाडल्या गेलेल्या एफ 16 फायटर विमानाची निर्माता कंपनी लॉकहीड मार्टिन भारताविरुद्ध कारवाई करणार असल्याचे ट्वीट पाकिस्तानी ब्यूरोक्रेट्स दान्याल गिलानी यांनी केले होते. पण त्याआधी आम्ही पाकिस्तानचे एफ 16 विमान पाडल्याचा भारताचा दावा पाकिस्तानने फेटाळून लावला होता. पण लॉकहीड मार्टीन यांनी यासंदर्भात पुढे येत माहीती दिली की गिलानी यांचा दावा खोटा आहे.
लॉकहीड यांच्या वक्तव्यानंतर पाकिस्तानच्या गिलानी यांची चांगलीच गोची झाली आणि त्यांनी स्वत:चे ट्वीट डिलीट केले. तरीही पाकिस्तानच्या उलट्या बोंबा थांबल्या नाहीत. पाकिस्तानी ब्यूरोक्रेट्सने स्वत:च्या स्टेटमेंटपासून पलटी घेतली. एफ 16 विमान पाडल्याचे सिद्ध करण्यास भारत सरकार अयशस्वी ठरल्याचे त्यांनी म्हटले. भारतीय मीडिया आणि पत्रकारांनी सरकारला चुकीची माहिती दिल्याचेही त्यांनी म्हटले. पण त्यानंतर भारतीय लष्करातर्फे यासंदर्भातील ठोस पुरावे सादर करण्यात आल्यानंतर पाकिस्तानची बोलती बंद झाली होती.