नवी दिल्ली - स्मार्टफोन तयार करणाऱ्या कंपन्यांमधील स्पर्धा दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. आपला स्मार्टफोन खपवण्यासाठी वेगवेगळी शक्कल मोबाईल तयार करणाऱ्या कंपन्यांकडून लढविली जाते. कधी कधी घसघशीत सूट दिली जाते, तर कधी कधी ईएमआय उपलब्ध करून दिला जातो. आता चीनमधील Huawei कंपनीच्या समर्थनार्थ चीनमधील विविध कंपन्या एकत्र आल्या आहेत. Huawei कंपनीवर हेरगिरी केल्याचा आरोप झाल्यानंतर ग्राहकांचा विश्वास वाढविण्यासाठी विविध कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी नवी योजना आखली. Huaweiचे स्मार्टफोनवर कर्मचाऱ्यांना घसघशीत सूट देण्यात येत आहे. ऍपलचे स्मार्टफोन वापरणे बंद करा आणि Huawei मोबाईल वापरायला लागा, यासाठी चीनमधील खासगी कंपन्या सरसावल्या आहेत आणि त्यांनी ही नवी शक्कल लढविली आहे.
Huawei कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी मेंग वांझोऊ यांना अमेरिकी अधिकाऱ्यांच्या मागणीनुसार कॅनडामध्ये अटक करण्यात आली. त्याचा विरोध करण्यासाठी चीनमधील कंपन्यांनी हे पाऊल उचलले असल्याचे निक्केई एशियन रिव्ह्यूच्या अहवालात म्हटले आहे. कंपनीच्या मदतीसाठी जर कर्मचाऱ्यांनी Huaweiचे स्मार्टफोन खरेदी केले, तर त्यांना सूट दिली जाईल. Huaweiच्या विक्री किमतीवर २० टक्क्यांपर्यंत सूट दिली जाईल. काही कंपन्यांनी आणखी पुढे जात या स्मार्टफोनचे सगळेच पैसे देण्यास सुरुवात केली आहे. चीनमधील एकूण २० पेक्षा जास्त कंपन्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून Huawei स्मार्टफोनसाठी सूट देण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर काही कंपन्यांनी ऍपलच्या फोनवर बहिष्कार टाकण्याचीही मागणी केली आहे.
चीनमधील माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, शांघाईमधील व्यावसायिकांच्या एक संघटनेने ऍपल उत्पादनांच्या खरेदीकर्त्यांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. चीनमधील न्यायालयाने डिसेंबरमध्येच ऍपलचे आयफोन मॉडेल्सच्या आयात आणि विक्रीवर निर्बंध लादले होते. ऍपलने त्यांच्या पेटंटचे उल्लंघन केल्याचे न्यायालयाने म्हटले होते.